जेंव्हा लष्कर खेळाडूचा शोध घेते…

नवी दिल्ली : काश्‍मिरात खंडित झालेली दूरध्वनी आणि इंटरनेटसेवा.. भारतीय महिला व्हिलचेअर बास्केटबॉल संघातील खेळाडू… निरोप देण्यात अडथळे… लष्कराची मदत… अखेर शिबिरासाठी रवाना… ही नाट्यमय घटना घडली ती इशरत अख्तर या खेळाडूसोबत…

भारतीय महिला व्हिलचेअर बास्केटबॉल संघाचे प्रशिक्षक माजी नौदल अधिकारी लुईस जॉर्ज यांच्यामुळं हे नाट्य घडलं. त्याचं झालं असं, काश्‍मिरातून 370 कलम हटवल्यानंतर तेथील इंटरनेट आणि दूरध्वनी सेवा खंडित झाली. त्यावेळी भारतीय महिला व्हिलचेअर बास्केटबॉल संघाची निवड झाली. त्यात इशरत अख्तर या 24 वर्षीय खेळाडूचा समावेश होता. पण तिच्याशी संपर्क होतच नव्हता.

लुईस यांचे शाळेपासूनचे मित्र कर्नल (निवृत्त) इसेनओव्हर यांच्याशी एकदा सहजच दूरध्वनीवर बोलत होते. इसेनओव्हर यांनी काही काळ गुप्तचर खात्यातही काम केले होते. त्यांच्याशी गप्पात काश्‍मिरचा विषय निघाला. त्यात इशरतचा उल्लेख झाला. इसेनओव्हर यांनी तिची माहिती आणि फोटो मागवला. ही गोष्ट 23 ऑगस्टची.

लुईस यांच्याकडे तिचा नेमका पत्ता नव्हता. तेव्हा त्यांनी तिचा नुसताच फोटो पाठवला. इसेनओव्हर यांनी आपल्या सुत्रांमार्फत आधी काश्‍मीर पोलिस आणि नंतर लष्कराशी संपर्क साधला. इशरत 25 ऑगस्टला तिच्या वडिलांसोबत घरी होती. त्यावेळी कोणीतरी दार ठोठावले. तिच्या वडिलांनी दार उघडले. दारात लष्कराचे जवान. घरात काही काळ घबराट पसरली.

जवानांनी इशरतचा फोटो दाखवत विचारलं ही तुमची कन्या आहे? हो म्हणताच ते जवान एकमेकांकडे पाहून हसले. त्यांनी सांगितले, तुमच्या मुलीची इंडीयन व्हिलचेअर संघात निवड झाली आहे. अभिनंदन. तुम्हाला परवा चेन्नईला जायचंय

27 ला सकाळीच लष्करी जवानांचे पथक आणि पोलिस इशरतच्या घरी पोहोचले. त्यांनी कडेकोट बंदोबस्तात तिला श्रीनगर विमानतळावर सोडले. विमानाने तेथून दिल्लीला आणि दिल्लीतून चेन्नईला रवाना झाली. लष्कराच्या या अनोख्या शोधमोहिमेमुळे एका खेळाडूचं देशासाठी खेळण्याचं स्वप्न पूर्ण झालं…

Leave A Reply

Your email address will not be published.