-माधुरी तळवलकर
फिल्मच्या सुरुवातीलाच नायक टूथपेस्टच्या ट्यूबमधून शेवटची पेस्ट दाबून काढण्याच्या प्रयत्नात दिसतो. बायकोला म्हणतो, “ही पुरली चांगली. आता नवीन टूथपेस्ट पुढच्या महिन्याच्या खर्चात जाईल.’ तेव्हाच कळते की, एका पक्क्या हिशेबी वृत्तीच्या माणसाची ही कथा आहे. पाट्या, पोस्टर्स रंगवून देण्याचा त्याचा लहानसा व्यवसाय आहे. दोन सहाय्यक आर्टिस्ट आणि त्याचा मुलगा (इरफान खान) हे रंगवून देण्याचे काम करताहेत. त्यातला एक आर्टिस्ट नोकरी सोडून निघून गेलाय. हा हळहळतो. म्हणतो, “एवढाले पगार देऊनही चांगले आर्टिस्ट मिळत नाहीत.’
तेवढ्यात एक शिक्षक त्यांच्या शाळेचा बोर्ड खराब झालाय म्हणून पुन्हा रंगवायला घेऊन येतात. ह्याची पारखी नजर त्यातील अक्षरांमधले कौशल्य बरोबर ओळखते. कौतुकाने बोर्ड कुणी केला ते विचारतो. त्यांच्याच मुलीने केलाय म्हटल्यावर ती पदवीधर आहे; नोकरी करते. शिवाय तिच्या हातात कला आहे… सगळी माहिती खुबीने काढून घेतो.
मग सहज म्हणून एकदा त्यांच्या शाळेत जातो. एकदा त्यांचे घर बघतो. एकुलती एक मुलगी. घर त्यांचे स्वतःचे. शिक्षक साधेपणाने सांगतात की, मुलगी इतकी गुणी आहे पण लोक हुंडा, सोने मागतात. ह्याचा मनातल्या मनात हिसाब किताब होतो आणि त्या दृष्टीने त्याची पावले पडू लागतात. जाणेयेणे वाढवतो. आपला मुलगा आणि ती मुलगी यांना एकमेकांशी बोलता यावे, त्यांचा परिचय व्हावा अशा दृष्टीने तो त्यांना मोकळे ठेवतो आणि मग एकूण रागरंग बघून आपल्या मुलासाठी मुलीला मागणी घालतो.
अगदी उदारपणाचा आव आणून म्हणतो, “मुलींना स्वातंत्र्य हवे. तिची नोकरी तशीच चालू राहील पुढे. आम्ही काही घरात कामवाली आणणार नाही. सून म्हणून आमची मुलगीच आणणार आहोत. आम्हाला हुंडा, सोने काही नको. आमचे विचार आधुनिक आहेत.’
मुलीचे आईवडील खूश होतात. आपसात बोलताना म्हणातात, “आपल्या पोरीनं नशीब काढलं. सासरचे लोक किती नवीन विचाराचे आहेत. मोकळेपणाने नोकरी करण्याची तिला परवानगी दिली.’ ह्याला मात्र आयुष्यभर दर महिन्याला पगार घरात आणणारी सून मिळवल्याचा आनंद असतो. शिवाय घरातल्या पेंटिंगच्या व्यवसायालाही तिची मदत होणारच. इतका मतलबी विचार करून मुलाचे लग्न जमवले तरी मुलीच्या आईवडिलांकडून उच्च विचार आहेत म्हणून मोठेपणाही मिळतो. हिसाब किताब पक्का!
त्याची बायको मात्र थोडी नाराज होते. फिल्मच्या शेवटी तिला तो जे समजावतो ते नक्कीच ऐकण्यासारखे! या मिश्किल फिल्ममध्ये एका बेरकी माणसाचे व्यक्तिचित्र उत्तमरीत्या चितारले आहे.