सत्यजित रे यांच्या एका लघुकथेवर “अनुकूल’ ही शॉर्ट फिल्म आहे. सर्व कामे करणारे यांत्रिक रोबो आता आपल्याला परिचित आहेत. निकुंज नावाचे हिंदी शिक्षक (सौरभ शुक्ला) एकटेच राहात असतात आणि घरातील सर्व कामे करण्यासाठी ते घरी रोबो आणण्याचे ठरवतात. जिथून ते हा “अनुकूल’ नावाचा रोबो आणतात, तिथली महिला त्यांना या रोबोसंबंधीची सर्व माहिती देते. ती सांगते, सातही दिवस चोवीस तास हा काम करेल. इतक्या प्रगत तंत्रज्ञानाने याला बनवले आहे की, तो वाचतो, बोलतो, चर्चा करू शकतो. तुमच्याकडून तो काही शिकूनही घेईल. सर्वसामान्य माणसासारखाच दिसतो.
निकुंज यांच्या घरी भरपूर पुस्तके बघून अनुकूल (परमब्रत चटर्जी) खूश होतो. अनुकूलचे व्यक्तिमत्त्व अगदी सौम्य, प्रसन्न. त्याला बघून त्याच्याबद्दल मित्रत्वाचीच भावना निर्माण होते. निकुंज हेही सुस्वभावी, सहिष्णू आणि शांत. दोघांचे चांगले जमते. काम नसेल तेव्हा रात्री वगैरे अनुकूल वाचत बसतो. एकदा निकुंज यांचा दारूडा भाऊ घरी येतो आणि या रोबोंमुळेच माझी नोकरी गेली, मी एकदा सगळे रोबो विकत घेऊन स्विच ऑफ करणार आहे, असे म्हणून त्याला इस्त्रीने एक तडाखा देतो. निकुंज सर त्याला घेऊन रोबोच्या मालकांकडे जातात आणि दुरुस्तीला देतात. तेव्हा त्या म्हणतात, “हे विसरू नका की, रोबोवर हल्ला झाला तर स्वसंरक्षणासाठी हाय व्होल्टेज शॉक देण्याची त्याला परवानगी आहे. ते कायदेशीर आहे’.
अनुकूलला घेऊन निकुंज सर घरी येतात. या फिल्ममधला सगळ्यात रोचक भाग म्हणजे अनुकूल गीतेचे पुस्तक वाचतो आणि निकुंज सरांना काही शंका विचारतो. भाऊ असूनही त्यांना मारण्यास कृष्ण अर्जुनाला का सांगतो? धर्म म्हणजे काय? न्याय-अन्याय कसा ठरवायचा? युधिष्ठिर एकदा असत्य बोलतो. मग खोटे कधी बोलायचे हे ठरवायचे कसे? त्यावर निकुंज सर सोप्या भाषेत, थोडक्यात, त्याला उत्तरेही देतात. ही प्रश्नोत्तरे दाखवण्याचा संबंध या लघुचित्रपटाशी कसा जोडला आहे, हे नंतर आपल्याला कळते. मात्र, त्यासाठी ही फिल्म काळजीपूर्वक ऐकावी आणि बघावी लागते.
सौरभ शुक्ला हा तर कसलेला कलाकार. तो सरळमार्गी, भला माणूस असलेला शिक्षक आपल्या अभिनयातून समर्थपणे उभा करतो. परमब्रत चटर्जी याने सालस यंत्रमानवाची भूमिका समजून उमजून केली आहे. त्याचे निरागस डोळे आपल्याला जिंकून घेतात.
अनुकूल या फिल्ममध्ये पुढे काय होते? स्वसंरक्षणाचा कायदा अनुकूलला वापरावा लागतो का? गीतेतल्या समजून घेतलेल्या तत्त्वांचा त्याला उपयोग होतो का? हे सारे कळण्यासाठी ही शॉर्ट फिल्म आवर्जून बघायला हवी.
– माधुरी तळवलकर