थेऊर (वार्ताहर) – कोविड-19चा प्रादुर्भाव आढळून आलेने हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी तालुक्यातील 11 गावातील ज्या ठिकाणी रूग्ण आढळून आले आहेत, ते परिसर मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहेत. यामुळे कोविड-19 चा वेगाने होणारा प्रसार रोखण्यासाठी व संभाव्य सामुदायिक प्रसार टाळण्यासाठी नागरिकांच्या हालचालींवर, बाहेर फिरण्यावर मर्यादा आणण्याकरिता मदत होणार आहे.
गावामध्ये 22 जून रात्री बारापासून पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. यामुळे या भागाच्या हद्दी सील करण्यात आल्या आहेत. या परिसरांच्या हद्दीमध्ये नागरिकांना प्रवेशबंदी व घरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात येत आहे. यामधून करोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे शासकीय कर्मचारी, पोलीस, राज्य व केंद्रीय विभागाचे विनिर्दिष्ट कर्मचारी व वाहने तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणांना वगळण्यात आले आहे.
तसेच अत्यावश्यक सेवा व वस्तु यांचा पुरवठा करणारी घाऊक वाहतूक या आदेशातून वगळण्यात आली आहे. या आदेशात नमूद क्षेत्रातील 65 वर्षावरील सर्व व्यक्ती, अति जोखमीचे आजार (मधूमेह, उच्च रक्तदाब, दमा, यकृत व मुत्रपिंडाचे आजार, कर्करोग, बाधित रुग्ण इ.) असलेल्या व्यक्ती, गरोदर महिला, वय वर्ष 10 पेक्षा कमी वयोगटातील मुले यांना अत्यावश्यक सेवा व वैद्यकिय कारणांशिवाय घराबाहेर जाता येणार नाही. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या बॅंकिंग सुविधांसाठी सर्व बॅंकांनी शाखा कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत सुरु तसेच एटीएम केंद्रे पूर्णवेळ कार्यान्वित रहाणार आहेत. सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीतच दूध, भाजीपाला, फळे या व इतर जीवनावश्यक व अत्यावश्यक सोयीसुविधा सुरू राहतील.
या गावांत मायक्रो कंटेन्मेंट झोन
वाघोली (वाघेश्वर सोसायटी), शेवाळवाडी (जि. प. शाळा परिसर), वाघोली (ऑझी इव्हॉल्व सोसायटी), थेऊर (थेऊर फाटा पूनावाला स्टड फार्म), पिसोळी (गगन लॅव्हीश अपार्टमेंट), नऱ्हे (शकुंतला बिल्डींग व दुर्वांकुर अपार्टमेंट) किरकटवाडी (उत्सव सोसायटी), भिलारेवाडी (गावठाण), केसनंद (ऑप्टीमा हाइट्स), कोरेगाव मूळ (ड्रीम्स निवारा 1ली विंग), देहू (चांदणी चौक माळवाडी व चेतन्यनगर विठ्ठलवाडी).