कवठे -निकटवर्तीयावरील अंत्यसंस्कारासाठी कवठे, ता. वाई येथे येऊन गेलेला पुणे पोलीस दलातील 35 वर्षांचा कर्मचारी करोनाबाधित असल्याची माहिती मिळाल्याने कवठे परिसरात घबराट पसरली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कवठे, ता. वाई येथील 35 वर्षांचा युवक पुणे पोलीस दलात कार्यरत आहे. कवठे येथील निकटवर्तीयाचा मृत्यू झाल्याने हा कर्मचारी अंत्यसंस्कारासाठी गावी आला होतो. तो 20 दिवस गावात मुक्कामी होता. तो गेल्या आठवड्यात गुरुवारी (दि. 18) हडपसर पोलीस ठाण्यात पुन्हा कामावर हजर होण्यासाठी गेला. तेथील नियमानुसार जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले जातात. त्यामुळे दुसऱ्या दिवशी (दि. 19) त्याच्या घशातील स्रावाचे नमुने घेण्यात आले. त्याचा अहवाल शनिवारी (दि. 20) पॉझिटिव्ह आल्याने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याची माहिती सोमवारी कवठे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. विजय ठोंबरे यांना कळविण्यात आली. गावात सर्वेक्षण करण्याचे निर्देश डॉ. ठोंबरे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले आहेत. करोनाबाधित रुग्णाच्या घरातील सात सदस्य व चार मित्रांना हाय रिस्क कॉंटॅक्ट म्हणून वाईतील किसन वीर कॉलेजमधील क्वारंटाइन केंद्रात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. डॉक्टर व आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्यांची तातडीची बैठक कवठे आरोग्य केंद्रात घेण्यात आली. कवठे परिसर सील होण्याची शक्यता करोनाबाधित राहत असलेला खडकाचा मळा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर यांनी जाहीर केला आहे. गावातील 30 ते 35 जण या बाधिताच्या संपर्कात आल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. आणखी कोणी त्याच्या संपर्कात आले होते का, याची माहिती घेण्यात येत आहे.