पुणे(प्रतिनिधी) – एमएचटी-सीईटी परीक्षा जुलै महिन्यात होत आहे. त्या परीक्षेसाठी यापूर्वीच अर्ज मागवले होते. आता पालकांच्या मागणीनुसार विद्यार्थ्यांना सीईटीसाठी अर्ज करण्यास मंगळवारपासून लिंक खुली केली आहे. विद्यार्थ्यांना 1 जूनपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी आवश्यक असलेली सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (एमएचटी-सीईटी) यंदा 5 लाखांहून अधिक अर्ज केले आहेत. ही परीक्षा 4 ते 31 जुलैदरम्यान होत आहे. याही कालावधीत परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 3 ते 5 ऑगस्टला पुन्हा परीक्षा होणार आहे. परंतु, यापूर्वी अर्ज करून पूर्ण करता आले नाही अथवा शुल्क भरले नाहीत. अशा सर्वच विद्यार्थ्यांना आता सीईटीसाठी अर्ज करता येणार आहे. दि. 26 मे ते 1 जूनपर्यंत रात्री 12 वाजपर्यंत अर्ज करण्यासाठी कालावधी देण्यात आला आहे.
राज्य सीईटी सेलमार्फत केंद्रीय पद्धतीने व ऑनलाइनद्वारे ही प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी नियमित शुल्कासह 7 जानेवारी ते 29 फेब्रुवारी या कालावधीत अर्ज करण्याची मुदत होती. त्यानंतर विलंब शुल्कासह अर्ज करण्यासाठी 1 ते 7 मार्च अशी मुदत होती. त्यांनतर ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरले पण शुल्क भरले नाहीत, त्यांनाही अर्ज पूर्ण करण्याची संधी देण्यात आली होती. आता पुन्हा अर्ज करता येणार आहे. ही शेवटची मुदतवाढ असल्याचे राज्य सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले.