नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर होणार
पुणे – राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण विभागाच्या विविध व्यावसायिक विषयांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) पुढे ढकलण्यात आल्या आहेत. करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे हा निर्णय घेतल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी दिली.
करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने या सर्व परीक्षा स्थगित केल्या आहेत. नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असे ट्विट सामंत यांनी केले आहे. पण, या परीक्षांची पुढील तारीख कधी जाहीर होणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी अनिवार्य असलेली एमएचटी-सीईटी, पदवी व पदव्युत्तरच्या हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, एमसीए या व्यावसायिक अभ्यासक्रम, तर विधी (लॉ), शारीरिक शिक्षण आणि अध्यापनशास्त्र या सीईटी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
सीईटी पुढे ढकलण्याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले जाणार असून, त्यात तंत्र व उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमांच्या सीईटीचा समावेश आहे,’ असे सीईटी सेलचे आयुक्त संदीप कदम म्हणाले. सामंत यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळता येणार नाही, त्यामुळे परीक्षा पुढे ढकलल्याचे सांगितले.
सामंत यांचा विरोधकांना टोला
“व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या व बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांनी कुणाच्याही अपप्रचाराला बळी पडू नये. सरकार आपल्यासोबत आहे. काही लोक आपल्या भवितव्याशी खेळत आहेत व स्वतःच्या अस्तित्वासाठी विद्यार्थ्यांचा उपयोग करत आहेत. विद्यार्थ्यांनो, काळजी करू नका मी तुमच्या सोबत आहे,’ असे सांगत उदय सामंत यांनी विरोधकांना टोला लगावला. विद्यार्थ्यांच्या कोणत्याही हिताला बाधा पोहोचू देणार नाही, अशी ग्वाहीही उदय सामंत यांनी दिली.