पुणे : करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध व्यावसायिक विषयांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज दिली.
महाराष्ट्र राज्य सीईटी सेलच्या माध्यमातून उच्च व तंत्र शिक्षण विभागांशी संबंधित विविध व्यावसायिक विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. मात्र करोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने या सर्व स्थगित करण्यात आल्या आहेत. नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असे ट्विट उदय सामंत यांनी आज केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी अनिवार्य असलेली एमएचटी-सीईटी, पदवी व पदव्युत्तरच्या हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, एमसीए या व्यावसायिक अभ्यासक्रम, तर विधी (लॉ), शारीरिक शिक्षण आणि अध्यापनशास्त्र या उच्च शिक्षण विभागाच्या अभ्यासक्रमांच्या सीईटी पुढे ढकलण्यात आले आहे.
दरम्यान, विद्यार्थी आणि पालकांकडून या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याविषयी सातत्याने मागणी होत होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून या सर्व परीक्षांच्या तारखा नव्याने जाहीर करण्यात येतील,’ असेही सामंत यांनी म्हटले आहे.