काही निराश पंतप्रधानांबाबत टोकाची पावले उचलू शकतात

केंद्रीय गृह खात्याचा का विरोधातील निदर्शनांच्या पार्श्‍वभूमीवर इशारा

नवी दिल्ली : का, एनपीआर आणि एनआरसी विरोधात राजधानीत निदर्शने सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर निराश झालेले काही जण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात टोकाची पावले उचलू शकतात, असा इशारा केंद्रीय गृहमंत्रालयाने संबंधित यंत्रणांना दिला आहे.

गुप्तचर खाते, विशेष संरक्षण गट (एसपीजी) यांना पाठवलेल्या पत्रात अत्यंत शिवराळ भाषेत पाठवली जाणारी धमक्‍यांची पत्रे आणि समाज माध्यमांत नरेंद्र मोदी यांच्याबाबत येणाऱ्या अवमानकारक कमेंट यांची माहिती देण्यात आली आहे. यातील काही पोस्ट अत्यंत शिवराळ आहेत. त्याची तीव्रता त्यांना मोदींबाबत वाटणाऱ्या शत्रुतेच्या भावनेची प्रचिती देतात. त्यामुळे अशा निराश लोकांकडून टोकाची पावले उचलली जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, असे या पत्रात म्हटले आहे.

रायसिना हिल्सपासून राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलनामुळे सुरक्षा यंत्रणांना आधीच अतिसतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मान्यवर या समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर मेस्सिआस बोल्सोनारो हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे आहेत. या कार्यक्रमाला असणाऱ्या धोक्‍यांची सुरक्षा यंत्रणांना कल्पना देण्यात आली आहे. त्यामुळे जमीनीपासून हवाई क्षेत्रापर्यंत सर्वत्र लक्ष ठेवण्यात येत आहे.

राजधानीत का कायद्या विरोधात आंदोलनाचा जोर आहे. जम्मू काश्‍मिरचा विशेष दर्जा काढल्यानंतर आणि त्या राज्याचे विभाजन केल्यानंतर हा पहिलाच प्रजासत्ताक दिन आहे. त्यामुळे निराश झालेले लोक टोकाची पावले उचलू शकतात, असे गृह खात्याच्या अधिकाराने सांगितले.

दिल्ली पोलिस आणि निमलष्करी दलाचे हजारो कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षा गटाच्या (एनएसजी) निष्णात नेमबाजांना शहरातील इमारतींवर तैनात करण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here