कराड – “एमएच फिफ्टी आता हॉर्नला सुट्टी’…”एम एच अकरा…आता हॉर्न विसरा’ अशा घोषणा शालेय विद्यार्थ्यांच्या मनात रूजवत व विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत कराडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी हॉर्नच्या दुष्परिणामांची माहिती दिली.
मलकापूर ता. कराड येथील रोटरी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात रोटरी संस्था व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कराड यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक सुरक्षा सप्ताहाचा सांगता समारंभ पार पडला. यावेळी संजय राऊत बोलत होते.
यावेळी सहाय्यक परिवहन अधिकारी रविंद्र चव्हाण, जनसंपर्क तथा करवसुली अधिकारी निळकंठ पाटील, मोटर वाहन निरीक्षक संदीप देसाई, अरविंद देसाई, काटकर, कोराणे, रोटरी शिक्षण संस्थेचे सचिव विलासराव पाटील आदींची उपस्थिती होती.
यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी हॉर्न वाजविण्याच्या दुष्पिरणामांची माहिती दिली. ते म्हणाले, वाहन चालवताना हॉर्न जेवढा आवश्यक आहे तेवढा त्याचा चुकीचा वापर केल्या तो जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे वाहन चालकांनी हॉर्नचा वापर काळजीपूर्वकच केला पाहिजे.
दरम्यान, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून राऊत यांनी मुक्त संवाद साधला. विद्यार्थ्यांना बोलते केले. सुरक्षित ड्रायव्हिंग, सुरक्षित प्रवास, आनंददायी प्रवास या संकल्पना स्पष्ट करत त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आई-बाबांना सांगता येतील, अशा सोप्या पध्दतीने वाहतुकीचे नियम समजावून दिले. यावेळी प्रश्नांना समर्पक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना राऊत यांनी खाऊ वाटप करून प्रोत्साहीत केले. सुषमा माने यांनी सूत्रसंचालन केले तर निलीमा बाबर यांनी आभार मानले. कार्यक्रमास अशोकराव पाटील, गुणवंतराव जाधव, भगवान मुळीक, शंकर सुर्वे, अक्षय गवळी उपस्थित होते.