पाम बीच (अमेरिका) – मेक्सिकोमधून अमेरिकेमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्या घुसखोरांवर जर मेक्सिकोने कारवाई केली नाही, तर मेक्सिकोबरोबरची सीमा बंद केली जाईल, अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. अमेरिकेच्या अन्य भागात घुसखोरी करणाऱ्या अन्य तीन देशांनाही ट्रम्प यांनी आर्थिक मदत नाकारण्याचा इशारा दिला आहे. सीमा बंद करण्याबाबतचा आपला इशारा गांभीर्याने दिलेला आहे. यामुळे जरी दोन्ही देशांना आर्थिक फटका बसला तरी त्याला आपली तयारी असेल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांनी यापूर्वीही अल सल्वाडोर, गुटेमाला आणि हुडुरास या देशांच्या सीमा बंद करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यांनी त्याची अंमलबजावणी केली नव्हती. आता या देशांची आर्थिक मदत बंद करण्याचा पर्याय ट्रम्प प्रशासनाने निवडला आहे. या देशांचे 2017 आणि 2018 साठीच्या पेमेंट रोखण्यात येईल, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
बेकायदेशीर घुसखोरांना रोखण्यासाठी मेक्सिकोच्या सीमेवर लांबलचक भिंत बांधण्याची ट्रम्प यांची दीर्घकाळापासूनची महत्वाकांक्षा आहे. त्यांनी धमकी दिल्याप्रमाणे सीमा बंद केल्यास सॅन दिएगोचा साऊथ टेक्सासबरोबरचा संपर्कही तुटण्याची शक्याता आहे. त्याचबरोबर मेक्सिकोमधील उत्पादनांची सुपरमार्केटमधून होणारी प्रचंड विक्रीही बंद होईल. अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये 1.7 अब्ज डॉलरचा दैनिक व्यापारी व्यवहार होतो. तो देखील बंद होण्याची भीती आहे.