पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – संपत्तीच्या वादातून सख्या मेव्हण्याची मध्यप्रदेश येधील कुस्ती पैलवानास सुपारी देण्यात आली. पैलवानाने साथीदारासह मेव्हण्याच्या तोंडावर मिरची पावडर टाकून हत्याराने वार करुन खुनाचा प्रयत्न केला. दाजीवर गुन्हा दाखल झाल्यावर दोन पैलवानांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली.
महेश महादेव ठोंबरे (२८, आगरवाल तालीम, कसबा पेठ) आणि फैजल खान (मध्यप्रदेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपटे रोड पुणे येथे राहणाऱ्या फिर्यादी यांचा हॉटेल व्यवसाय आहे. ते घरी आले असताना दोघांनी पत्ता विचारण्याचा बहाण्याने त्यांचे तोंडावर तिखट टाकून हत्याराने वार करुन गंभीर जखमी केले.
या प्रकरणी डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे, महेश बामगुडे, शशिकांत दरेकर, अभिनव लडकत, नीलेश साबळे यांनी घटनास्थळापासून बालगंधर्व रंगमंदिर चौक, वृद्धेश्वर घाट, पुणे महापालिका, गाडीतळ चौक, मालधक्का चौक येथील सीसीटीव्ही फुटेज पाहून संशयी आरोपी हे पुणे स्टेशन येथे गेल्याचे निष्पन्न केले.
यातील आरोपी महेश यास ताब्यात घेतले. तपासात त्याने हा गुन्हा फिर्यादीचे दाजी अश्विनीकुमार शेषराव पाटील (५२ रा. कमलनिवास, आपटे रोड) यांच्या सांगण्यावरुन ५० हजार रुपायांची सुपारी घेऊन पैलवान फैजलखान व त्याचे दोन मित्र यांच्यासह केला असल्याचे सांगितले.
अश्विनीकुमार पाटील यास ताब्यात घेतले असता, त्याने त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार पैलवान फैजल खान याला अटक करण्यात आली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक निरीक्षक अशिष कवठेकर आदींच्या पथकाने केली.
संपत्तीचा वाद
फिर्यादी आणि त्यांची बहीण एकाच ठिकाणी रहातात. त्यांच्यात संपत्तीवरुन वाद आहेत. बहिणीला हजच्या वाटणीची संपत्ती दिल्यास दाजी अश्विनकुमार त्याचा गैरवापर करेल, अशी फिर्यादीला भीती होती. यामुळे ते वाटा देत नव्हते, अशी माहिती पोलिसांनी दिली.