नवी मुंबई :- मुंबईत मेट्रो सुरू झाल्यापासून नागरिकांचा प्रवास सुखकर झालेला आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना देखील आता ही सुविधा मिळावी, असा प्रस्ताव सिडकोकडून ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तकडून हिरवा कंदील मिळाला असून सीएमआरएसचे प्रमाणपत्र सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र. 1 ला देण्यात आलेले आहे. त्यामुळे आता लवकरत नवी मुंबईकरांना बेलापूर ते पेंधरदरम्यान मेट्रोतून प्रवास करता येणार आहे.
नवी मुंबईत रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी चार उन्नत मेट्रो मार्ग विकसित करण्यात येत आहे. सिडको नवी मुंबईमार्फत हे काम करण्यात येत आहे. यातील बेलापूर ते पेंधर या मार्गाचे काम प्रथमतः हाती घेण्यात आलेले आहे.
सिडकोतर्फे मार्ग क्र. 1 च्या अंमलबजावणीसाठी अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून महा मेट्रोची नियुक्ती करण्यात आली असून सिडकोच्या मेट्रो मार्ग क्र.1 च्या अंमलबजावणीसाठी सिडकोला आयसीआयसीआय बॅंकेकडून 500 कोटी रुपयांचा आर्थिक पुरवठा करण्यात आलेला आहे.
नवी मुंबईतील या पहिल्या मेट्रोच्या मार्गिकेला सीएमआरएस प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने लवकरच आता बेलापूर ते पेंधर मार्गिकेवर नवी मुंबईतील पहिली मेट्रो धावणार आहे. अनेक अडीअडचणींवर मात करून बहुप्रतीक्षित अशी नवी मुंबई मेट्रो सेवा लवकरच सुरू होणार असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.