पुणे, दि. 26 -मेट्रो प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर वेगवान सेवा देण्यासाठी या मार्गावर अत्याधुनिक दर्जाची कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिग्नलिंग यंत्रणा (सीबीटीसी) बसविण्यात येणार आहे. यामुळे मेट्रोच्या ट्रेन दर दोन मिनिटांनी एकामागून एक सोडणे शक्य आहे. या यंत्रणेची यशस्वी चाचणी महामेट्रोने नुकतीच केली.
वनाज ते गरवारे महाविद्यालय मार्गावर एका मागे एक अशा तीन ट्रेन सोडून ही चाचणी करण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास ती वेगाने धावणार आहे. तसेच मेट्रोच्या वेळांची माहितीही प्रवाशांना अचूक मिळणार आहे. दरम्यान, गरवारे महाविद्यालय ते सिव्हिल कोर्ट आणि सिव्हिल कोर्ट ते फुगेवाडीपर्यंत मेट्रोचे संचलन लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यानंतर सिग्नल यंत्रणेमुळे मेट्रो हायस्पीड तसेच पूर्ण क्षमतेने चालविणे शक्य होणार आहे.
अशी आहे सिग्नल यंत्रणा
ही सिग्नल यंत्रणा अत्यंत अत्याधुनिक असून, ती ट्रेनच्या सिग्नलिंग व ट्रेन कंट्रोलवर आधारित आहे. प्रत्येक ट्रेनमध्ये एक उच्च दर्जाचा संगणक असेल. तो सिग्नल यंत्रणेशी सतत संपर्कात असेल. त्यातून एका मागोमाग असलेल्या ट्रेन आपले अंतर, वेग, तसेच सिग्नलशी संबंधित सर्व माहिती या ट्रेनच्या संगणकावर पाठवतील. या यंत्रणेमुळे मेट्रो ट्रेन चालकविरहितही चालवणे शक्य आहे. ट्रेनमधील ऑपरेटर हे केवळ डब्यांचे दरवाजे उघडणे आणि बंद करणे तसेच संगणक यंत्रणेचे निरीक्षण करतील. त्यामुळे ट्रेन सुरू करणे, तिचा वेग वाढविणे, प्लॅटफार्मवर येऊन थांबणे ही सर्व कामे ही स्वयंचलित यंत्रणा करेल.