थिरूवनंतपुरम – मेट्रो मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले नामांकित तंत्रज्ञ ई श्रीधरन हे भारतीय जनता पक्षात येत्या 21 फेब्रुवारीला अधिकृतपणे प्रवेश करणार आहेत. आपल्या राजकारण प्रवेशा मागचे कारणही त्यांनी लगेच स्पष्ट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की मला राज्यपालपदात स्वारस्य नाही, मला मुख्यमंत्री होण्यात स्वारस्य आहे.
केरळात भारतीय जनता पार्टी सत्त्तेवर आली तर आपण येथे मुख्यमंत्री होऊ इच्छितो असे त्यांनी नमूद केले आहे. राज्यापाल पदावर राहुन मी जास्त काही करू शकत नाही कारण हे केवळ घटनात्मक पद असले तरी तेथे कामाला खूपच कमी वाव आहे असे त्यांनी म्हटले आहे.केरळसाठी चांगले काम करण्याची आपली इच्छा आहे असेहीं त्यांनी म्हटले आहे.
ई श्रीधरन यांनी भाजप प्रवेशाची घोषणा केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भारतीय जनता पक्षाला केरळात मुख्यमंत्रीपदासाठी लोकप्रिय ठरेल असा चेहरा नाही. त्यामुळे त्यांनी ई श्रीधरन यांनाच या मैदात उतरवण्याची खेळी भारतीय जनता पक्षाने केली आहे. त्यांनीही आपल्याला मुख्यमंत्रीपदात स्वारस्य असल्याचे नमूद करून आपला व भाजपचाहीं रोख स्पष्ट केला आहे.
केरळात भाजपकडे पुरेसे केडर नाही. त्यामुळे तेथील निवडणूक त्यांना कोणता तरी लोकप्रिय चेहरा पुढे करूनच लढवावी लागणार होती. त्यानुसार त्यांनी लोकांच्या पसंतीस उतरेल असा चेहरा निवडला आहे असे सांगितले जाते. ई श्रीधरन हे निस्पृह व कर्तबगार तंत्रज्ञ म्हणून देशभर प्रसिद्ध आहेत आणि त्यांना पद्म पुरस्कार देऊनही भारत सरकारने गौरव केला आहे.