शेतकरी नेते चढूनी यांचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, ‘चौकशीला आलेल्या पोलिसांना गावातच…’

नवी दिल्ली – कृषी कायद्यांवरून शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात सुरू असलेला संघर्ष कमी होण्याची चिन्हे नाहीत. तो वाढतच जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आता भारतीय किसान युनियनचे नेते गुरनाम सिंह चढूनी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे लवकर काही तोडगा निघेल अशी शक्‍यता सध्यातरी दिसत नाही.

हरियाणातील एका खाप पंचायतीत बोलताना चढूनी म्हणाले की, दिल्लीहून कोणी पोलिस तुमच्या गावात चौकशीसाठी आले आणि त्यांनी कोणाला अटक केली, तर त्या पोलिसाला घेराव घालून त्याला गावाताच बसवून ठेवा. त्याला तुमच्या घरी बसवा. चांगले खाउपीऊ घाला.

जोपर्यंत जिल्हाधिकारी गावात येत नाहीत व पोलीस पुन्हा चौकशीसाठी येणार नाहीत असे आश्‍वासन देत नाहीत तोपर्यंत त्या पोलिसाची सुटका करू नका. त्याच्याशी कोणता गैरव्यवहार करू नका.

चंढूनी पुढे म्हणाले की दिल्लीत 26 जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचाराच्या तपासाच्या नावाखाली दिल्ली पोलीस क्रूरपणे वागत आहेत. दिल्ली पोलिसांनी जर नोटीस बजावून कोणाला चौकशीसाठी बोलावले तर हजर होउ नका. ते शेतकऱ्यांना मुद्दाम त्रास देत आहेत.

गाडीची नंबरप्लेट पाहून नोटीस पाठवली जाते आहे. चौकशीला सहकार्य करा असे सांगत आहेत. त्यांनी अगोदरच 30 जणांना नोटीस पाठवली आहे. कोणी शेतकऱ्यांच्या संदर्भात एखादे गाणे म्हटले तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो आहे. तर कोणी काही ट्‌वीट केले तर त्यालाही अटक केली जाते आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

चढूनी यांनी प. बंगालमध्ये झालेल्या कार्यक्रमातही सरकारच्या विरोधात शेरेबाजी केली आहे. जेव्हा भारतीय जनता पार्टीचा पराभव होईल तेव्हाच आपल्या आंदोलनाचा विजय होईल. जो आमचे जगण्याचे साधन हिसकावतो आहे त्या पक्षाला मतदान करू नका. अन्य कोणालाही मत द्या, मात्र भारतीय जनता पार्टीला मत देउ नका असे आवाहन त्यांनी बंगालमधील शेतकऱ्यांना केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.