पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो सुरू होऊन एक वर्ष उलटून गेले आहे. यानिमित्ताने मेट्रोचे संचलन पाहण्यासाठी दैनिक प्रभात च्या प्रतिनिधीने मेट्रोच्या स्थानकांची तसेच मेट्रोची पाहणी केली असता वर्षभरातच अनेक अडचणी असल्याचे दिसून आले आहे. अजूनही मेट्रोच्या सर्व स्थानकांचे काम पूर्ण झालेले नाही. अंतर कमी असल्याने प्रवासी संख्या देखील कमीच आहे आणि मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरू झाली नाहीत. अशा परिस्थितीतही आतापासूनच अनेक अडचणी दिसून येत आहेत. यात एसी बंद असणे, वेंडिंग मशीन धिम्या गतीने कार्यरत असणे, एलिव्हेटर देखील वेळेवर सुरू न होणे, असे प्रकार आढळून आले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात सध्या पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो धावत आहे. मात्र, चार डब्यांच्या या मेट्रोमध्ये मोजके प्रवासीही दिसत नाहीत. तसेच वर्षभरातच मेट्रोच्या संचलनात अनेक अडचणी दिसून येत आहेत. शेवटच्या डब्यातील एसी बंद असून त्याचा केवळ खडखडाट सुरू आहे. तसेच डिजिटल वेंडिंग मशिनही स्लो झालेले आहे. सध्या प्रवासी नसल्याने त्याचा जास्त परिणाम होत नाही. मात्र, प्रवासी वाढल्यास यांचा मोठा फटका बसू शकतो. त्याच प्रमाणे पिंपरी स्थानकावरील एलिव्हेटर पायऱ्या चढून प्रवासी वर जाऊ लागल्यावर सुरू होतो. ही भीतीदायक स्थिती असल्याचे प्रवाशांनी सांगितले.
मागील वर्षी मेट्रो सुरू झाल्याने अनेकजण त्याची सफर करताना दिसत होते. तसेच उन्हाळी सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांनी या मेट्रो सफरीचा आनंद लुटला. काही दिवसांत मेट्रो शिवाजीनगर, स्वारगेटपर्यंत धावेल, असा दावा मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. तेव्हा प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता आहे. सध्या पिंपरी, वल्लभनगर, नाशिकफाटा आणि फुगेवाडी या चार स्टेशनपर्यंत सुमारे 7 किलोमीटरपर्यंत ही मेट्रो धावत आहे. प्रत्येक अर्ध्या तासाला मेट्रोचा पिंपरी ते फुगेवाडी दरम्यान धावते. दुपारच्या वेळी तर, केवळ दोन-चार प्रवासी त्यात दिसून येत आहे.
अत्याधुनिक सुविधा
महामेट्रोने प्रत्येक स्टेशनवर प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा पुरविल्या आहेत. लिफ्ट, एलिव्हेटर, ऑनलाइन तिकीटासाठी स्वयंचलित डिजिटल वेंडिंग मशिनसह अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्या सुविधांकडे दुर्लक्ष दिसून येत आहे. ऑनलाइन तिकीटासाठी स्वयंचलित डिजिटल वेंडिंग मशिन स्लो झाले आहे.
उशिरा सुरू होणारा एलिव्हेटर
पिंपरी स्टेशनमधील एलिव्हेरला सेन्सर असल्याचे सांगण्यात येते. मात्र एलिव्हेटर बंद असल्याचे समजून प्रवासी सामान्य जिन्याप्रमाणे पायऱ्या चढायला लागतात. प्रवासी काही पायऱ्या चढून वर गेल्यानंतर अचानकच एलिव्हेटर सुरू होत असल्याचे दिसून आले. यामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ प्रवासी घाबरण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
फुल्ल एसीचा खडखडाट
मेट्रोची सफर ही सात मिनिटांसाठी का होईना पण फुल्ल एसीमध्ये होते असल्याने प्रवासी सुखावतात. मात्र, या चार डब्यांमधील शेवटच्या डब्यातील एसी बंद असून त्याचा केवळ खडखडाट सुरू होता. वर्षभरातच हा अनुभव नागरिक घेत आहेत.