पिंपरी (प्रतिनिधी) – रेशनिंग दुकानावर गोंधळ घालणाऱ्या चार जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी व पोलिसांशी हुज्जत घातल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 24) सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारास चिंचवड स्टेशन येथील मोहननगर पोलीस चौकीत घडला.
तुषार बाबू मंजाळकर (वय 25), तेजस दिगंबर शिंदे (वय 24), जया बाबू मंजाळकर (वय 46), वंदना दिगंबर शिंदे (वय 45, सर्व रा. इंदिरानगर, चिंचवड) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कर्मचारी धर्मराज तोडकर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
आरोपी रेशनिंग दुकानावर गोंधळ घालत होते. याबाबत नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना पोलीस चौकीत आणले. तिथेही आरोपींनी आत्महत्येची व वरिष्ठांकडे तक्रार करण्याची धमकी देत सरकारी कामात अडथळा आणला.