पुणे – मी लहान असताना मुंबई मध्ये क्रिकेट शिवाय इतर खेळांना प्रोत्साहन दिले जात नव्हते. घराशेजारी टेनिस आणि बॅडमिंटन कोर्ट असतानाही पालकांकडून क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित केले जात होते. मी जर मुंबई ऐवजी पुण्यामध्ये असतो तर चांगला बॅडमिंटनपटू झालो असतो. पुणे ही बॅडमिंटन नगरी असून या ठिकाणी बॅडमिंटनसह क्रिकेट व्यतिरिक्त अनेक खेळांना प्रोत्साहन दिले जात आहे ही निश्चितच कौतुकाची बाब आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन स्टेडियम उभारण्यासाठी संघटनेला निश्चितच सहकार्य करेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटनेतर्फे पुणे जिल्ह्यातील गुणवंत बॅडमिंटनपटू आणि तांत्रिक अधिकाऱ्यांचा राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. संघटनेचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या नियमक मंडळाचे अध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, पीडीएमबीएचे मानद सरचिटणीस सीए रणजीत नातू, सहसरचिटणीस सीए आनंद जोशी,वरिष्ठ उपाध्यक्ष शशांक हळबे आदी यावेळी उपस्थित होते.
MS Dhoni : खेळावर व संघावर निष्ठा ठेवली तर यश निश्चितच मिळेल – धोनी
शरयू रांजणे, साद धर्माधिकारी, पूर्वा बर्वे, आर्य भिवपाठकी, दर्शना पुजारी, श्रुती मुंदडा, नपुरा गाडगीळ, अजित उमराणी, मंजुषा सहस्त्रबुद्धे, वृषाली उपाध्ये, गिरीश नातू, सुकांत कदम या खेळाडू आणि बॅडमिंटन पंच यांना पुना गेम ऑनर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आला. रणजीत नातू यांनी सूत्रसंचालन केले. शशांक हळबे यांनी आभार मानले.