नगर -बुथ हॉस्पिटलने शहरासह जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम केले आहे. करोना संसर्ग विषाणूच्या काळात सर्वत्र भीतीचे वातावरण असताना सर्वात आधी पुढे येऊन त्यांनी करोना रुग्णांवर उपचार सुरू केले.
संसर्गजन्य विषाणू असल्याने भीतीने कोणीही पुढे येत नव्हते. परंतु अशा परिस्थिती बुथ हॉस्पिटलेच डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे हॉस्पिटल मधील डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. आ. जगताप यांच्या मानधनातून वाढदिवसानिमित्त बुथ हॉस्पिटलला 51 हजारांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी बुथ हॉस्पिटलचे डॉ. मेजर देवदान कळकुंभे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, डॉ. सागर बोरुडे, सचिन जाधव, सुमित कुलकर्णी, विकी जगताप, सत्येन गुंदेचा, परिमल निकम, वैभव वाघ, वैभव ढाकणे, संतोष ढाकणे, माऊली जाधव, गजेंद्र भांडवलकर आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. कळकुंभे म्हणाले की, बुथ हॉस्पिटलने नेहमीच रुग्णांची सेवा ही ईश्वर सेवा समजून केली आहे. करोना संसर्ग विषाणूच्या संकटात आमच्या हॉस्पिटलने प्रामाणिकपणे करोना रुग्णांची सेवा केली.
बुथ हॉस्पिटल आर्थिक संकटात असताना सुद्धा आमचे सर्व कर्मचारी चांगल्या प्रकारे सेवा देत आहेत. आ.जगताप यांनी पुढे येऊन आमच्यासाठी आर्थिक मदत केली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.