औरंगाबाद – राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावरील आरोप प्रकरणी आरोप करणाऱ्या पीडित तरुणीने घुमजाव केले आहे. यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. विशेष म्हणजे, आरोप करणाऱ्या पीडित तरुणीने भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीमुळे चित्रा वाघ आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्याविरोधात औरंगाबादच्या जीन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
काही महिन्यांपूर्वी मेहबूब शेख यांच्यावर एका तरुणीने बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी 28 डिसेंबर 2020 रोजी औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण या प्रकरणातील पीडितेने घुमजाव केले. चित्रा वाघ यांनीच आपल्याला मेहबूब शेख यांच्याविरोधात खोटी बलात्काराची तक्रार द्यायला लावली होती, असा खळबळजनक आरोप पीडितेने केला आहे.
या प्रकरणात सुरेश धस यांचा देखील सहभाग असल्याचा दावा पीडितेने केला आहे. चित्रा वाघ यांनी मीडियाशी कसे बोलायचे ते शिकवले, तर सुरेश धस यांनी जे लिहून दिले ते मीडियासमोर बोलायला सांगितले, असे गंभीर आरोप पीडितेने केले आहेत.