पुणे – शहरात निवासी मिळकतींची 40 टक्के करसवलत पुन्हा सुरू करणे. वाढीव पाण्याचा कोटा मिळावा, ससूनच्या धर्तीवर हडपसर भागासाठी नवीन रुग्णालय, समाविष्ट गावांच्या विकासासाठी हजार कोटींचे अनुदान अशा विषयांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यातील अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेणार आहेत, अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी दिली.
भानगिरे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शहराच्या वेगवेगळया समस्या तसेच प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठक घेण्याची विनंती करत मागण्यांचे निवेदन सादर केले.
भानगिरे म्हणाले, “शहराचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यात मिळकतकर सवलत, वाढीव पाणी कोटा, वाहतूक समस्या, मुळशी धरणातून शहरासाठी वाढीव 5 टीएमसी पाणी, पीएमपी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा, यासह हडपसर विधानसभा मतदारसंघातील अनेक समस्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
हे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून तातडीनं या बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचना कार्यालयास दिल्या आहेत. तसेच या प्रश्नांशी संबधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या जाणार असून लवकरच मुंबईत ही बैठक घेतली जाणार आहे.’