मुंबई – सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या पुढील सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उद्या, सोमवार 11 जानेवारी रोजी नवी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी सुनावणीसाठीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात येणार आहे.
सदर बैठक सोमवारी सायंकाळी 5 वाजता नवीन महाराष्ट्र सदनमध्ये पार पडणार आहे. या बैठकीला उपसमितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे-पाटील, अनिल परब यांच्यासह राज्य शासनाने नेमलेले वरिष्ठ विधीज्ञ, शासकीय तसेच खासगी याचिकाकर्त्यांचे वकील उपस्थित राहणार आहेत.
मराठा समाज व शासकीय वकिलांमध्ये समन्वय साधण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या पाच खासगी वकिलांच्या समितीचे सदस्यदेखील या बैठकीत ऑनलाइन सहभागी होणार आहेत. मराठा आरक्षणाबाबत येत्या 25 जानेवारीपासून दैनंदिन स्तरावर नियमित सुनावणी करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीत जाहीर केले होते.
त्यानुसार राज्य सरकार आपल्या रणनितीवर अंतिम हात फिरवत असून, आजवर झालेल्या तयारीची समिक्षा केली जाते आहे. दरम्यान, मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाने मागील सुनावणीत नकार दिला होता. 25 जानेवारीपासून दैनंदिन स्तरावर नियमित सुनावणी करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीत जाहीर केले होते.
मराठा आरक्षणाच्या स्थगितीपूर्वीच्या नोकरभरतीच्या अंमलबजावणीला परवानगी नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. राज्य सरकारच्या मागणीनुसार मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणीसाठी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाची स्थापना झाली आहे.