मुंबई – कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. विधीमंडळातील अजित पवार यांच्या दालनात जवळपास अर्धा तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये झालेल्या बंडाळीनंतर शरद पवार यांच्या गटात असलेल्या रोहित पवार यांनी अजित पवार यांची प्रथमच भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पावसाळी अधिवेशनात एमआयडीसीच्या मुद्द्यावर रोहित पवार यांनी जोरदार टीका केली होती. याबाबत त्यांनी एक दिवसाचे आंदोलन देखील केले होते. यावर आंदोलनावर अजित पवार यांनी थेट नाराजी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर कदाचित प्राथमिक भेट ही उपमुख्यमंत्र्यांसोबत असावी, असे म्हटले जात आहे.
या भेटीनंतर रोहित पवार म्हणाले, स्पर्धा परीक्षेसाठी 1000 रुपये घेतले जात आहे. याबाबत उपमुख्यमंत्र्यांना माहिती दिली. तसेच पिक विमा भरताना संकेतस्थळ डाऊन असल्याने अनेकांना विमा भरता आला नाही, त्यात मुदत वाढवण्याची मागणी केली.