इस्लामपुरात 24 जणांच्या स्रावाचे नमुने  मिरजेचे वैद्यकीय तपासणी पथक शहरात 

इस्लामपूर  – शहरातील शासकीय वसतिगृहातील इन्स्टिट्यूट क्वारंटाइनमध्ये असलेल्या 24 जणांच्या घशातील स्रावांचे नमुने मिरज येथील वैद्यकीय पथकाने काल (दि. 26) येथून नेले. ते तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरसिंह देशमुख यांनी दिली. दरम्यान, संसर्ग झालेल्यांची प्रकृती स्थिर असून शहरातील नागरिक आणि प्रशासनाच्यादृष्टीने हे दिलासादायक वृत्त आहे.

सांगली जिल्ह्यात करोना संसर्गाचे केंद्र बनलेल्या इस्लामपूरमधील “त्या’ कुटुंबाच्या संपर्कात आलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. हे कुटुंब राहात असलेला परिसर अगोदरच सील करण्यात आला आहे. प्रभाग नऊचा परिसर बुधवारी (दि. 25) रात्री उशिरा पुन्हा सील करण्यात आला. तेथील कुटुंबांचे सर्वेक्षण व तपासणी मोहीम सुरू झाली असून त्यासाठी नगरपालिका प्रशासन रात्रंदिवस कार्यरत आहे.
सौदी अरेबियातून हज यात्रा करून आलेल्या इस्लामपुरातील एकाच कुटुंबातील चार जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे सोमवारी (दि. 23) वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट झाले होते.

त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या कुटुंबाशी संबंधित आणखी 13 जणांना विलगीकरणात पाठविण्यात आले होते. त्यांच्या संपर्कातील 24 जणांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटइनमध्ये ठेवण्यात आले आहे. आयसोलेशनमधील 13 पैकी पाच जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे बुधवारी (दि. 25) वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट झाले. उर्वरित आठ जणांच्या पहिल्या चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

अजून 12 जणांचे अहवाल येणे बाकी आहे. आता एकूण 36 जणांचे अहवाल येणे अपेक्षित आहे. करोनाचे रुग्ण सापडलेल्या परिसरातील 850 घरांमधील चार हजार जणांची तपासणी करण्यात आली आहे. आरोग्य विभागाची दहा पथके शहरात कार्यरत आहेत. होम क्वारंटाइनमधील लोक आरोग्य विभागाच्या निरीक्षणाखाली आहेत. त्यांच्यापैकी कोणामध्येही सध्या करोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील यांनी सांगितले. करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:हून आपत्कालीन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.