लखनौ: उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची बुधवारी बहुजन समाज पक्षाच्या (बसप) राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. बसपच्या केंद्रीय कार्यकारिणी बैठकीत एकमताने त्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
फेरनिवडीनंतर मायावती यांनी बसपची चळवळ पुढे नेण्यासाठी अथकपणे कार्यरत राहण्याची ग्वाही दिली.
महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली आणि झारखंडमधील आगामी विधानसभा निवडणुका बसप संपूूर्ण ताकदीने लढेल. त्या निवडणुकांत भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांविरोधात लढावे लागेल, अशी भूमिका त्यांनी मांडली. उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाशी (सप) केलेली आघाडी तुटल्याच्या बाबीवरही बसपने अंतिम शिक्कामोर्तब केले. उत्तरप्रदेशातील 13 विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत. त्यासाठी स्वबळावर लढण्याचा नारा देताना बसपने बहुतांश जागांवरील उमेदवार जाहीर केले.
लोकसभा निवडणुकीसाठी बसप आणि सपने हातमिळवणी केली होती. मात्र, भाजपच्या झंझावातामुळे त्या पक्षांची आघाडी फार प्रभाव पाडू शकली नाही. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर बसपने एकला चलो रेची भूमिका जाहीर केली. त्यानंतर सपनेही स्वतंत्रपणे लढण्याचे ठरवले. आता उत्तरप्रदेशातील पोटनिवडणुकांमुळे आघाडी विखुरण्याची औपचारिकता पूर्ण झाली आहे.