Bihar Loksabha Election 2024 – मायावती यांचा बहुजन समाज पक्ष आपल्यासोबत यावा यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या इंडिया आघाडीच्या नेत्यांना अद्याप यश आलेले नाही. उत्तर प्रदेशात आपण स्वबळावर लढणार असल्याचा नारा मायावती यांनी अगोदरच दिला होता. मात्र आज त्याहीपुढे जात त्यांनी इंडियाला मोठा धक्का दिला आहे. त्यांनी शेजारच्या बिहार या राज्यात लोकसभेच्या सर्व ४० जागा लढवणार असल्याची आज घोषणा केली आहे.
बसपाचे केंद्रीय प्रभारी आणि राज्यसभा सदस्य रामजी गौतम म्हणाले की बिहारमध्ये सगळ्या जागा लढवणार आहोत. आता चार दिवस या राज्यात आमच्या बैठका होणार आहेत. बक्सर येथून बिहारचे प्रभारी अनिल सिंह यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आठवडाभरात अन्य ३९ उमेदवार जाहीर केले जातील. सामाजिक समीकरण लक्षात घेत प्रत्येक जागेवर उमेदवार दिले जाणार आहेत. जेथे ज्या सामाजाचे प्राबल्य असेल तेथे त्या समाजाच्या व्यक्तीला तिकीट दिले जाईल. आमचा प्रत्येक उमेदवार कसा निवडून येईल याकडे आमचे लक्ष असेल.
कोणाचा तोटा होणार?
उत्तर प्रदेशातील दलित समाज मायावती यांच्या मागे आहे. या समाजाची १२ ते १३ टक्के मायावतींना मिळतच असतात. या राज्याव्यतिरिक्त राजस्थान आणि मध्य प्रदेशातही मायावतींना मानणारा मोठा वर्ग आहे. आता त्यांनी बिहारमध्ये एन्ट्री घेतल्यामुळे कदाचित त्यांना खाते उघडता येणार नाही. तथापि, दलित समुदायाच्या मतांची विभागणी होणे अटळ आहे.
यंदाच्या निवडणुका अगदी घासून होणार आहेत. चार पाच हजारांच्या फरकानेही उमेदवार विजयी आणि पराभूत होऊ शकतो. अशात मायावती यांचा उमेदवार कॉंग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवाराला झटका देणाराच ठरू शकतो. एनडीए आघाडीतील नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलालाही याची झळ पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.