नवी दिल्ली – बसपा प्रमुख मायावती यांच्या आई रामरती यांचे शनिवारी हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले आहे. त्या 92 वर्षाच्या होत्या. बसपा नेते सतीश चंद्र मिश्रा यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
रामरती यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. निधनाचे वृत्त समजताच मायावती दिल्लीला रवाना झाल्या आहेत. उद्या दिल्लीत रामरती यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या वर्षी मायावतींचे वडील प्रभू दयाल यांचेही निधन झाले आहे.
मायावती सध्या उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. प्रत्येक जिल्ह्यात सातत्याने प्रचार सुरू आहे. पक्षीय पातळीवर अनेक बैठकाही होत आहेत. अशातच ही दु:खद घटना घडली. आईच्या निधनानंतर काही दिवस बैठकांचा फेरा शांत होऊ शकतो. सध्या या कठीण काळात बसपाचा प्रत्येक कार्यकर्ता मायावतींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून रामरती यांना श्रद्धांजली वाहत आहेत.