नवी दिल्ली – म्यानमारमधील चीनच्या सीमेजवळील गाव बंडखोरांनी ताब्यात घेतले असल्याचे म्यानमारच्या लष्करी प्रशासनाने म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांपासून लष्कर आणि बंडखोरांमधील संघर्ष सुरू आहे. अशातच लष्करी राजवटीने या भागातून आपले सैन्य मागे घेतले आहे. त्यामुळे सीमेजवळील गाव आता पूर्णपणे बंडखोरांच्या आघाडीच्या ताब्यात गेले असल्याचे लष्करी राजवटीने म्हटले आहे.
लष्कराने शस्त्रे खाली ठेवली आणि माघार घेण्याची तयारी दाखवल्यानंतर द थ्री ब्रदरहूड अलायन्स या बंडखोरांच्या आघाडीने लौकाइंग गावाचा ताबा घेतला, असे दोन्ही बाजूंनी म्हचटले आहे. लष्कराकडील शस्त्रे आणि दारुगोळ्याचा मोठा साठा बंडखोरांनी ताब्यात घेतला असून त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत.
लौकाइंग ही कोकांग स्वायत्त प्रांताची राजधानी आहे. भौगोलिकदृष्ट्या हा भाग चीनच्या सीमेला लागून असलेल्या शान प्रांताचा भाग आहे. दलथ्री ब्रदरहूड अलायन्समध्ये म्यानमार नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स आर्मी, द तांग नॅशनल रिबलेशन आरमी आणि अराकान आर्मी या तीन संघटनांची आघाडी आहे. य आघाडीमध्ये मूळ चिनी वंशिया कोकांग अल्पसंख्यांकाचाही समावेश आहे.