मुंबई : माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस. शरद पवार यांचा वाढदिवस सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. 80 व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर त्यांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते पंतप्रधानांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सर्वशक्तिमान देव शरद पवारांना दीर्घायु्ष्य देवो, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्यांना चांगले आरोग्य लाभो, असेही मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
Best wishes to @PawarSpeaks Ji on his birthday. May Almighty bless with good health and a long life.
— Narendra Modi (@narendramodi) December 12, 2020
शरद पवार यांचा जन्म 21 डिसेंबर 1940 रोजी झाला. शरद पवार यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव पवार आणि आईचे नाव शारदाबाई पवार आहे. बारामतीच्या लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या त्यांच्या कन्या आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांचे पुतणे आहेत. ते चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत. 1999 साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
शरद पवारांनी केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री तसेच कृषिमंत्री म्हणून देखील काम सांभाळले आहे. राजकारणाबरोबरच क्रिकेट हे देखील पवारांच्या आवडीचे क्षेत्र आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदासह त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपद देखील सांभाळले आहे. सध्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारचे मुख्य सूत्रधार शरद पवार यांनाच मानले जाते.