पुणे – बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर हा आपल्या आगामी “ब्रह्मास्त्र’ चित्रपटात व्यस्त आहे. त्याला नुकताच चित्रपट निर्माता लव रंजन यांच्या कार्यालयाबाहेर पाहण्यात आले. यावेळी रणबीरसह श्रद्धा कपूरलाही लव रंजन यांच्या कार्यालयाबाहेर स्पॉट करण्यात आले. लव रंजन यांच्या अनटायटल्ड प्रॉजेक्टमध्ये रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांची जोडी प्रथमच झळकणार आहे.
या वर्षाच्या सुरुवातीस श्रद्धा कपूर म्हणाली होती की, लव रंजन यांच्या चित्रपटात मी आणि रणबीर एकत्रित काम करणार आहे. मला त्याचा “प्यार का पंचनामा’, “सोनू के टीटू की स्वीटी’ चित्रपट खूपच आवडतात. तसेच रणबीर कपूरसोबत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. तो सध्याच्या जनरेशनमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे. मला त्याच्यासोबत काम करायला नक्कीच आवडेल, असे तिने सांगितले होते.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास श्रद्धा कपूर अखेरच्या वेळी “बागी-3’मध्ये झळकली होती. याशिवाय श्रद्धा कपूरने तीन सिरीज असलेला एक चित्रपट साइन केला आहे, जो एका इच्छाधारी नागीणवर आधारित असणार आहे. दुसरीकडे रणबीर कपूरबाबत सांगायचे झाल्यास डायरेक्टर अयान मुखर्जी यांच्या मल्टीस्टारर “ब्रह्मास्त्र’मध्ये तो आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय, डिंपल कपाडिया, अक्किनेनी नागार्जुनसह स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. यात रणबीर कपूरने आपली गर्लफ्रेंड आलिया भट्टसोबत पहिल्यांदाच काम केले आहे.