- मावळात 49 गावात उद्या मतदान; प्रशासनाची तयारी पूर्ण
वडगाव मावळ – मावळ तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून धडाडणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोफा बुधवारी (दि. 13) सायंकाळी थंडावल्या. उद्या, शुक्रवारी (दि. 15) मतदान होणार असल्याने अधिकाधिक मतदान मिळवण्यासाठी आता उमेदवारांसाठी गुरुवारी “जागते रहो’च्या भूमिकेत राहणार आहे.
करोना संकटानंतर गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीचा प्रत्येक उमेदवाराने जोरदार प्रचार केला. अनेक ठिकाणी पॅनेल उभे करून उमेदवारांनी प्रचारात रंग भरला. ग्रामपंचायतीचा मतदारसंघ छोटा असल्याने बहुतेक उमदेवारांनी घरोघरी जाऊन भेटीगाठी घेण्यावरच भर दिला. तर काहींनी शक्तीप्रदर्शन करून गावात आपलीच “वट’ असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. काही उमदेवारांनी तर शेतात राहणाऱ्या मतदारांची त्यांच्या शेतात जाऊन भेट घेऊन आपल्यालाच मतदान करण्याचा आग्रही केला. अधिकाधिक उमेदवारांनी आपले चिन्ह मतदारराजापर्यंत पोहाचविण्यासाठी युक्त्या-क्लृपत्या लढविल्या. काहींनी ट्रॅक्टरवर उभे राहून जोरदार प्रचार केला. बहुतेकांनी पदयात्रेवर भर दिला.
मावळ तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीच्या 151 मतदान केंद्रावरील मतदान यंत्रे सील करण्याची प्रक्रिया तळेगाव दाभाडे येथील पै. विश्वनाथराव भेगडे क्रीडा संकुलमध्ये झाली. या वेळी मतदानासाठी 200 मतदान यंत्रांना सील करण्यात आल्याची माहिती निवडणूक नियंत्रण अधिकारी, मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, संतोष सोनवणे यांनी दिली.
मावळ तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीच्या 151 मतदान केंद्रासाठी 151 मशीन तसेच 49 राखीव मशीन यावेळी सील करण्यात आल्या. यासाठी 34 टेबलाचे नियोजन करण्यात आले होते. या प्रत्येक टेबलावर 1 निवडणूक अधिकारी, सहायक अधिकारी, कर्मचारी तसेच उमेदवार किवा त्याचा प्रतिनिधी उपस्थित होते.
ग्रामपंचायतीसाठी उद्या, शुक्रवारी (दि. 15) मतदान होत आहे. त्यासाठीची सर्व यंत्रणा आज सज्ज करण्यात आली आहे. त्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली.
तळेगावकर अनुभवणार निकालाचा जल्लोष
मावळ तालुक्यातील ग्रामपंचायती अस्तित्वास आल्यापासून आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीतील मतमोजणी प्रथमच तळेगाव दाभाडे येथे होत आहे. यामुळे प्रथमच ग्रामीण भागातील निकालाचा जल्लोष तळेगावकरांना अनुभवायला मिळेल.