मावळ : निसर्ग वादळाचा नुकसानग्रस्तांना भरपाईच्या धनादेश

  • राजमाची परिसरातील नागरिकांना मदत
  • 32 लाख रुपयांची भरपाई

मावळ – निसर्ग चक्रीवादळामुळे मावळ तालुक्‍यातील राजमाची परिसरातील नुकसान झालेल्या नागरिकांना खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते भरपाई धनादेशचे वाटप करण्यात आले. या वेळी नागरिकांना 32 लाखांवर नुकसान भरपाई देण्यात आली. महाविकास आघाडी सरकारने निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना अधिकाधिक मदत करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार राजमाची परिसरातील नुकसानग्रस्तांना मदत दिली असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

उधेवाडी गावात शुक्रवारी (दि. 16) झालेल्या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, संपर्कप्रमुख बाळा कदम, तहसीलदार मधुसूदन बर्गे, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, राजमाची परिसरातील उदेवाडी गावच्या सरपंच येवले आदी उपस्थित होते.
निसर्ग चक्रीवादळाचा रायगड आणि पुणे जिल्ह्याला मोठा फटका बसला होता. या भागातील सर्वाधिक नुकसान झाले होते.

मावळ लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, मावळ तालुक्‍यातील सर्वाधिक नागरिकांचे नुकसान झाले होते. मावळ तालुक्‍यासाठी 16 कोटी 28 लाख 97 हजार 900 रुपये नुकसान भरपाईसाठी अनुदान प्राप्त झाले आहे. त्यापैकी 32 लाख 1 हजार रुपयांच्या धनादेशाचे शुक्रवारी वाटप करण्यात आले. ही मदत राजमाची उधेवाडी परिसरातील नागरिकांना देण्यात आली. लोणावळा खंडाळापासून 17 किलोमीटर अंतरावर डोंगर, कपारीत राजमाची हा पुरातन किल्ला आहे. आजूबाजूला मोठी झाडी, वनखात्याची जमीन आहे.

निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या परिसराला निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला होता. नागरिकांच्या घरांसह अन्य नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते. महाविकास आघाडी सरकारने अधिकाधिक मदत या भागासाठी दिली आहे. या मदतीसाठी स्थानिक आमदार, खासदारांनी पाठपुरावा केला होता. महाविकास आघाडी सरकारने निसर्ग चक्रीवादळाच्या फटका बसलेल्यांना जास्त मदत करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार राजमाची परिसरातील नुकसानग्रस्तांना मदत दिली आहे, असे बारणे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.