कार्ला गडावर घटस्थापना

Madhuvan

  • एकवीरा देवी नवरात्र उत्सवाला प्रारंभ

कार्ला – महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला, वेहरगाव येथील कुलस्वामिनी आई एकवीरा देवीच्या मंदिरात प्रशासकीय समिती सदस्य, गुरव, पुजारी, अभिषेक, मानकरी यांच्या हस्ते घटस्थापनेने नवरात्र उत्सावाला प्रारंभ झाला. करोना महामारीचा संसर्ग टाळण्यासाठी यंदा उत्सव साधेपणाने होत आहे.
महाराष्ट्रातील तमाम आगरी कोळी, कुणबी समाजाची तसेच ठाकरे घराण्याची कुलदैवत असणाऱ्या कार्ला एकवीरा देवीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात; परंतु यावर्षी करोनाचा संसर्ग वाढू नये याकरिता मर्यादित भाविकांच्या उपस्थित शनिवारी (दि. 17) सकाळी सात वाजता घटस्थापनेने झाली.

करोना या जागतिक महामारी संकटामुळे अद्याप महाराष्ट्रातील सर्व देवस्थाने बंद असल्याने कार्ला, वेहरगाव मंदिर प्रशासकीय समितीच्या आवाहनाप्रमाणे व नोंदणी झालेल्या तीन भाविक दाम्प्÷यांच्या हस्ते देवीचा अभिषेक झाला. त्यानंतर प्रशासकीय समितीचे अध्यक्ष संजय मुळीक, वेहेरगाव सरपंच चंद्रकांत देवकर, पोलीस पाटील अनिल पडवळ, भाविक रवींद्र भोईर, सुनील पाटील, माजी सरपंच गणपत पडवळ, पुजारी संजय गोविलकर, गुरव प्रतिनिधी नवनाथ देशमुख, काळूराम देशमुख, विजय देशमुख, गणेश देशमुख, संजय देवकर व अन्य गुरव प्रतिनिधी यांच्या हस्ते देवीचे घट बसविण्यात आले.

देवस्थाने बंद असली तरी मुंबई, ठाणे, नवी मुंबई भागातील काही भाविक मध्यरात्रीपासून मंदिराच्या प्रवेशद्वाजवळ येऊन बसले होते. पहाटेपासून पायथ्याजवळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

देवस्थानचे प्रशासकीय व्यवस्थापक मंगेश गायकवाड कर्मचारी बाळू गायकवाड, तानाजी ढमाले, सुनील पाटील, दादा देवकर, श्रीमती गायकवाड यांनी मंदिर परिसरातील व्यवस्था राखली होती. दोन भाविकांनी गडावर विद्युत रोषणाई केल्याने लॉकडाऊनमध्ये देखील देवीचा गड परिसर लख्ख प्रकाशाने उजळून निघाला होता.

राज्यात सर्वत्र करोनाचे संकट असल्याने नवरात्र उत्सवात मंदिर हे भाविकांसाठी बंदच आहे. ज्या भाविकांनी अभिषेकासाठी आगाऊ नोंदणी केली आहे. त्यांना पहाटे गडावर प्रवेश दिला जाणार आहे, याची भाविकांनी नोंद घ्यावी, तसेच तांत्रिक अडचणी दूर करत दोन तीन दिवसांत देवीची आरती “लाईव्ह’ दाखविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासकीय समितीचे अध्यक्ष संजय मुळीक यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.