ICC ODI World Cup 2023 Ind vs Eng Match : टीम इंडियाने वर्ल्ड कप 2023 मध्ये 5 सामने खेळले आहेत आणि या सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघाने सहज विजय मिळवला आहे. या स्पर्धेतील भारत हा एकमेव संघ आहे ज्याला आतापर्यंत एकाही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला नाही. टीम इंडिया सध्या वर्ल्ड कप 2023 च्या पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. या 5 विजयानंतर टीम इंडिया वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या उंबरठ्यावर आहे. जर टीम इंडियाने पुढचा सामना जिंकला तर त्याचा उपांत्य फेरीतील प्रवेशही निश्चित होईल.
टीम इंडिया आता आपल्या पुढच्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडशी भिडणार आहे. हा सामना रविवारी (29 ऑक्टोबर) दुपारी 2 वाजता होणार आहे. लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या विश्वचषकात या मैदानावर तीन सामने खेळले गेले आहेत. यापैकी एका सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने बाजी मारली, तर उर्वरित दोन सामन्यांमध्ये पाठलाग करणाऱ्या संघाला यश मिळाले. तिन्ही सामन्यांमध्ये फलंदाजी इतकी सोपी राहिलेली नाही. या खेळपट्टीवर फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाज दोघांनाही समान मदत मिळाली आहे.
तुम्हीही 29 ऑक्टोबर रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात एकना स्टेडियमवर होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकाच्या सामन्याच्या तिकिटांसाठी वेबसाइट शोधत असाल, तर सावधान…! iccw0rldcuptickets.com या बनावट वेबसाइटवर फसव्या मार्गाने तिकिटांच्या नावाखाली पैसे घेऊन फसवणूक केली जात आहे.
या वेबसाइटवर 2,000 रुपयांपासून 18,790 रुपयांपर्यंतच्या दरात तिकिटे विकली जात आहेत. ईमेल अॅड्रेस आणि इतर डेटा गोळा करून, दिलेल्या पत्त्यावर लवकर तिकिटे पाठवण्याचे आश्वासन देऊन पैसे गोळा केले जात आहेत. तिकिटांच्या दरातही सवलत दिली जात आहे. फेसबुक आणि इतर सोशल मीडियावरही लिंकद्वारे याबाबत प्रचार करत आहेत. दुसरीकडे, उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने ही साइट बनावट असल्याचे म्हटले आहे.
असोसिएशनचे सीईओ अंकित चॅटर्जी यांनी सांगितले की, क्रिकेट विश्वचषकाच्या सर्व सामन्यांची तिकिटे फक्त बुक माय शो या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत. याशिवाय इतर कोणत्याही साइटवर तिकिटे उपलब्ध असल्यास UPCA (उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन) जबाबदार राहणार नाही. याआधीही अनेक बनावट वेबसाइटवर तिकीटांची विक्री झाली होती.
दरम्यान, सर्वसामान्यांना आयसीसीच्या वेबसाईटवरून सामन्यांच्या तिकिटांची माहिती सतत मिळत होती, पण बराच वेळ फक्त कमिन्स सूनचा (Coming Soon) संदेश येत होता. बुक माय शो ही Book my Show साईट सोमवारी रात्री 8 वाजल्यापासून उघडली, पण काही वेळातच You are in Queue असा मेसेज येऊ लागला आणि मग तिकीट विकल्याचा मेसेज आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या एकूण 50 हजार क्षमतेच्या या स्टेडियममध्ये ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे 8000 तिकिटांची विक्री केली जाणार आहे. ऑफलाइन तिकीट विक्रीबाबत UPCA कडून कोणतीही माहिती मिळालेली नाही.