मुंबई :- राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठया प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. सरकारने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पहाटे 4 वाजता काढून अधिकृतरित्या प्रसिद्ध न करता अधिकाऱ्यांना व्हाट्सअपवर का दिले? असा सवालही दानवेंनी सरकारला विचारला आहे.
दानवे पुढे बोलताना म्हणाले, राज्यात महसूल विभागात 200 बदल्या झाल्या असून त्या खालोखाल वन, कृषी, उत्पादन शुल्क विभागात मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या असून यात मोठया प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. शासन आपल्या दारी आणि अधिकारी मंत्र्यांच्या घरी हा प्रकार चालू असल्याची, टीकाही दानवेंनी केली.
वन विभागात झालेल्या बदल्यांबाबत भाजपच्याच 4 आमदारांनी तक्रार केल्यानंतर त्या बदल्या थांबविण्यात आल्या. कृषी विभागाच्या सचिवांनी या बदल्या होऊ शकत नाही, सदर बदलीस ते अधिकारी पात्र नाही, असा शेरा मारला असतानाही पदोन्नती केल्या गेल्या.
तर उत्पादन शुल्क विभागात वर्ग 3 व वर्ग 4 चे अधिकार सचिवांकडे असताना मंत्र्यांनी बदल्या केल्या असल्याचा आरोप दानवे यांनी करत बदल्यांवर झालेल्या भ्रष्ट्राचाराबाबत सरकारवर ताशेरे ओढले.