मुंबई – आदिपुरुष रिलीज झाल्यापासून वादात सापडला आहे. यामुळे चित्रपटाचे निर्माते चांगलेच अडचणीत आले आहेत. आता रामानंद सागर यांच्या रामायणात भगवान श्री रामांच्या भूमिकेत दिसलेल्या अरुण गोविलनेही निर्मात्यांना फटकारले आहे. आदिपुरुषच्या स्क्रिनिंगच्या वेळी चित्रपटगृहात एक जागा रिकामी ठेवण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला होता त्यावरून देखील गोविल यांनी भाष्य केलं आहे.
अरुण गोविल यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आदिपुरुष बद्दल सांगितले. यावेळी गोविल यांनी आदिपुरुषच्या रिलीजपूर्वी निर्मात्यांच्या प्रमोशनल रणनीतीबद्दल सांगितलं.अरुण गोविल यांनी हिंदू देवी-देवतांची खिल्ली उडवणाऱ्या निर्मात्यांवर संताप व्यक्त केला. यासोबतच त्यांनी आदिपुरुषच्या रिलीजपूर्वी ओम राऊत आणि त्यांच्या टीमने अनेक राज्यांच्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीबद्दल आपले मत मांडले.
आदिपुरुषच्या प्री-रिलीजबद्दल बोलताना अरुण गोविल म्हणाले, “मला वाटतं जेव्हा त्यांनी चित्रपटाचा टीझर रिलीज केला तेव्हा त्यांना समजलं की हा चित्रपट खळबळ उडवून देणार आहे. परंतु तोपर्यंत चित्रपट पूर्ण तयार झाला होता अशात ते काहीही करू शकणार नव्हते म्हणून ते भाजपच्या प्रत्येक मुख्यमंत्र्याला जाऊन भेटत होते असं गोविल यांनी यावेळी म्हंटले.
गोविल पुढे म्हणाले, “त्यांनी भगवान हनुमानासाठी एक सीट रिकामी ठेवली होती. हे त्यांचे प्रमोशनचे प्लॅनिंग होते. त्यांना चित्रपटाबाबत फारसा आत्मविश्वास नव्हता आणि जेव्हा चित्रपट प्रदर्शित होणार होता तेव्हा त्यांना माहित होते की काहीतरी चुकतंय.अशावेळी एक सामान्य माणूस म्हणून, एक बिझनेसमॅन म्हणून, तुम्ही अशा आयडियाजचा अवलंब करता.