अहमदाबाद – अहमदाबादच्या शाहिगबा येथील राजस्थान रुग्णालयाच्या तळघरात पहाटे आग लागल्याची दुर्घटना घडली. या आगीमुळे तब्बल 125 रुग्णांना इतर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीची माहिती मिळताच अहमदाबाद अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेतली.
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्थीचे प्रयत्न करावे लागले. हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामामुळे तळघरात ठेवलेल्या अनेक वस्तूंना आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर धूर झाला, होता.
इमारतीच्या दोन तळघरांमध्ये प्रचंड धूर असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे आठ तास लागले. या घटनेमुळे रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रूग्णांचे स्थलांतर केले आहे.
रुग्णालयात सुमारे 125 रुग्ण होते. रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर दोन रुग्ण आयसीयूमध्ये होते. या रुग्णांना आनंद हॉस्पिटल, ओसवाल आणि बीएपीएस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
500 मीटर रस्ता बंद !
रुग्णालयातील आगीच्या घटनेमुळे रास्ता रोको करून वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती. घेराव सर्कलकडून राजस्थान हॉस्पिटलकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली. शाहीबाग पुलावरुन राजस्थान रुग्णालयाकडे येणारा रस्ताही बंद करण्यात आला. त्यानंतर झोन-4 डीसीपी, ट्रॅफिक डीसीपी, एसीपी, पाच पीआयसह मोठा पोलिस ताफा घटनास्थळी दाखल झाला.