कोलकाता – बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ गेल्या काही दिवसांपासून निखिल जैनसोबतच्या लग्नामुळे वादात सापडली आहे. 19 जून 2019 रोजी निखिल आणि नुसरतने मोठ्या थाटामाटात लग्न केले होते. दोघांनीही तुर्कीमध्ये लग्न केले आणि तुर्की विवाह नियमांच्या आधारावर यांचा विवाह झाला होता. त्याआधारे नुसरतने निखिलपासून विभक्त होण्यासाठी घटस्फोटासाठी अर्ज करण्यास नकार दिला होता. तुर्कस्तानचा कायदा भारतात वैध नाही, त्यामुळे तिच्या लग्नालाही येथे मान्यता नाही, असे नुसरतचे म्हणणे आहे.
The marriage of actor-politician Nusrat Jahan and Nikhil Jain is 'not legally valid', rules a court in Kolkata pic.twitter.com/sE0fQl01LS
— ANI (@ANI) November 17, 2021
कोलकाता न्यायालयाने सांगितले विवाह कायदेशीररित्या वैध नाही
कोलकाता न्यायालयाने आता नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांचे पहिले लग्न कायदेशीररित्या अवैध ठरवले आहे. नुसरत जहाँचा दावा योग्य मानून कोर्टाने दिलेल्या आदेशात श्रद्धेच्या आधारावर नुसरत जहाँ मुस्लिम आणि निखिल जैन हिंदू असल्याचे म्हटले आहे. कोलकाता न्यायालयाने सांगितले की, नुसरत आणि निखिल जैन यांचे भारतीय विशेष विवाह कायद्यानुसार लग्न झालेले नाही. असे कोर्टाने आदेशात म्हटलं आहे.
नुसरत जहाँने लग्नावर सोडले मौन
निखिल जैनसोबतच्या लग्नावरून झालेल्या वादावर नुसरत जहाँने मीडियाशी बोलताना आपली बाजू मांडली होती. नुसरत म्हणाली होती की, ‘मला त्यांना काही सांगायचे नाही, त्याने ना माझ्या हॉटेलचे बिल भरले आहे ना माझ्या लग्नाचा खर्च उचलला आहे. माझी प्रतिमा चुकीच्या पद्धतिने मांडण्यात आली आहे. त्यामुळे आता मी या सर्व गोष्टी स्पष्ट करत आहे. मी पूर्णपणे प्रामाणिक आहे. आपला मुद्दा पुढे करत नुसरत जहाँ म्हणाली की, आपल्यासाठी कोणावरही आरोप करणे खूप सोपे आहे, परंतु तिने तसे केले नाही.
नुसरतने निखिलवर फसवणुकीचा केला होता आरोप
त्यावेळी नुसरत जहाँ चर्चेत आली होती. जेव्हा तिने निखिल जैनसोबतचे लग्न वैध नसल्याचे जाहीर केले होते. लग्नाच्या वादामुळे दोघेही काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या दोघांच्याही नात्यावर सातत्याने प्रश्न उपस्थित होत होते.त्यानंतर नुसरतने निखिलवर पैशांचा गैरवापर आणि फसवणूक केल्याचा आरोप करत निखिलसोबतचे तिचे लग्न अवैध असल्याचे म्हटले होते. तर दुसरीकडे निखिलने नुसरतच्या वागण्यावरही प्रश्न उपस्थित केले होते.
२०१९ मध्ये निखिल जैनसोबत लग्नगाठ बांधली
अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी २०१९ मध्ये निखिल जैनसोबत तुर्कीमध्ये लग्न केले होते. त्यांनी केलेल्या आंतरधर्मीय विवाहामुळे देखील त्यावेळी बऱ्याच चर्चेत आल्या होत्या. पण लग्नाच्या वर्षभरातच दोघांमध्ये खटके उडू लागले आणि अखेर त्यांनी हे लग्नच अमान्य असल्याचे सांगितले. त्यामुळे याची चर्चा संपूर्ण देशभरात रंगली होती.