नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांतील अमेरिका-इराणमधील तणाव आणि अमेरिका-चीन शीतयुद्धापासून मध्यपूर्वेतल्या अनेक राजकीय घडामोडींमुळेही इतर गुंतवणुकी अस्थिर बनतील आणि सोन्याकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढेल, अशी चिन्हं असल्याने, भारतासह जगभर सोन्या-चांदीच्या दरांतील चढ-उतारांकडे बाजाराचे लक्ष असेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भारतात केंद्रिय अर्थसंअक्ल्पाचे दिवसही जवळ येत असल्याने सध्या गुंतवणुकीबाबत कोणीही मोठी रिस्क घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे दिसून येत आहे.
वर्ष 2020 चा विचार करता पहिल्या दोन-चार महिन्यांपर्यंत गुंतवणूकदारांनी 41 हजार ते 41,500 रुपयांपर्यंत भाव चढल्यास सोन्याची विक्री करण्यास हरकत नाही. मात्र दीर्घकालीन म्हणजे वर्षभराचं लक्ष्य असेल तर 44,500 ते 45 हजार रुपये दहा ग्रॅमपर्यंत भाव चढतील; त्यावेळी सोन्याची विक्री करण्यास हरकत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
गेल्या वर्षीच्या पहिल्या सहामाहीत सोन्याचा दर 31,500 ते 32,000 रुपये प्रति 10 ग्रॅम असताना तुलनेत ग्राहकांनी चांगली खरेदी केली. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत ग्राहकांनी फारशी सोनंखरेदी केली नाही.
सरकारनं जकात करातही आधीच्या 10 टक्क्यांमध्ये 2.5 टक्क्यांनी वाढ केली. 12.5 टक्के जकात करामुळे स्थानिक बाजारपेठेत सोन्याचे दर गगनाला भिडले. त्या आधीच्या वर्षाच्या या कालखंडातल्या सोनंखरेदीच्या तुलनेत या कालावधीत 2019 मध्ये लक्षणीय घट झाली. तरीही पारंपरिक लग्नसराईच्या मोसमात सोन्याची थोडीफार खरेदी झालीच. म्हणूनच ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलच्या मते, मागणीचा विचार करता 2019 हे संमिश्र वर्ष होतं. भारतात गेल्या वर्षी अवेळी पाऊस झाला. अनेक ठिकाणी ओला दुष्काळ पडला.
सोन्याचे 70 टक्के ग्राहक ग्रामीण भागात असल्यामुळेही खरेदीवर परिणाम झाला. यंदा पाऊस चांगला झाला आणि पिकांचं नुकसान झालं नाही तर मागणीत वाढ होईल आणि त्यामुळेही सोन्याचे दर वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यंदा सोन्याची मागणी 700 ते 750 टन एवढी असेल. अमेरिका आणि युरोपमधल्या ईटीएफ (एक्सचेंज ट्रेडेड फंड) मध्ये आणि देशांच्या मध्यवर्ती बॅंकांकडून मात्र सोन्याला यंदाही जोरदार मागणी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.