पुणे – गणेशोत्सव म्हटला की घरगुती सजावटींच्या वस्तूंची रेलचेल बाजारपेठेत दिसून येते. यामध्ये महत्त्वाचा भाग हा मखरांचा असतो. अनेकविध प्रकारची मखरे बाजारात सध्या पहायला मिळत आहेत. पूर्वी गणपतीची प्रतिष्ठापना अतिशय साध्या पद्धतीने होत असे. मात्र, कालांतराने त्याला सजावट करण्याला सुरूवात झाली. लाइटच्या रंगीबेरंगी माळा, थर्माकोलची आसने, मखरे बनवली जाऊ लागली. इतकेच नव्हे तर उंदीरही थर्माकोलची बनवली जाऊ लागली. याशिवाय अनेक चमचमत्या गोष्टींनी ते सजवण्याला सुरूवात झाली.
आता मखरांचेच अनेक प्रकार बाजारात आले असून, कोणते “चॉइस’ करावे असा प्रश्न याठिकाणी पडतो. प्लायवूडपासून बनवलेली मखरे या काळात सर्वात लक्षवेधी असतात. ही “रॉ’ स्वरुपात बाजारात मिळतात. त्याला आपण हव्या त्या रंगांनी सजवून ती सजावटीसाठी वापरू शकतात. यामध्ये सरस्वतीयंत्र, कमळ, विविध प्रकारची आसने त्यावर केलेले हत्ती, सिंहासन असे कोरीव काम केलेली मखरे सध्या बाजारात उपलब्ध आहेत.
याशिवाय कायमस्वरुपी आसनांचीही “व्हरायटी’ सध्या पहायला मिळते. अस्सल सागवानमध्ये बनवलेली ही आसने दिसायलाही अत्यंत सुंदर आणि कायस्वरुपी होतात. त्यावर सुंदर नक्षीकाम केलेले असते.