आंबेगाव पूर्व भागातील शेतकरी संतप्त
लोणी धामणी – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात एक महिन्यापूर्वी शासनाच्या विविध विभागांचे अधिकाऱ्यांनी भेट देऊन दुष्काळग्रस्त भागांची पहाणी केली आहे. तालुक्यातील आणि स्थानिक शेतकरी, नागररिक यांच्याशी चर्चा केली आहे; पण आतापर्यंत कुठलीच कारवाई झाली नाही. हे अधिकारी येथे पर्यटनाला आले होते का, असा प्रश्न पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र करंजखेले यांनी केला आहे, तर पाण्याअभावी शेती व जनावरांचे प्रचंड हाल चालू आहेत, अशा परिस्थितीत दुष्काळ जाहीर करायला वाट कुणाची बघता असा प्रश्न या परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी सरकारला विचारला आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळ जाहीर करावा, पिकांचे सरसकट पंचनामे करावेत, नुकसान भरपाईची कार्यवाही करून त्वरीत चारा डेपो व रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत, अशी मागणी खरेदी विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष विठ्ठल ढगे व सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वाळूंज आणि या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी, धामणी, वडगावपीर, मांदळेवाडी, पहाडदरा, शिरदाळे ही गावे दुष्काळग्रस्त गावे म्हणून ओळखली जातात. पावसाअभावी खरीप हंगाम पूर्ण वायला गेला आहे. आता रब्बी हंगाम सुरू झाला आहे; पण फक्त एखाद्या पावसाने कशीबशी हजेरी लावली आहे.
पाण्याचे टॅंकर सुरू
या परिसरातील शेतकऱ्यांचा नजरा अकाशाकडे लागल्या आहेत. पावसाने जूनपासूनच दडी मारल्याने वरील गावांमध्ये पाण्याचे टॅंकर सुरू आहेत, त्यामुळे पाण्याची सोय झाली; पण जनावरांच्या चाऱ्याचे काय, असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे. पाऊस अनेक दिवस न पडल्याने पिकांची स्थिती गंभीर बनली आहे. त्यामूळे पावसाअभावी पिके करपून गेली आहेत. भूजलपातळी खोलवर गेली असून विहिरी, नाले, विंधन विहिरी कोरड्या पडल्या आहेत.
… अन्यथा आंदोलन
शासनाने दुष्काळाने त्रस्त झालेल्या या भागात आता तरी जनावरांसाठी चारा डेपो सुरू करावा, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा वरील दुष्काळग्रस्त गावातील सरपंच व शेतकऱ्यांनी दिला आहे.
आंबेगावातील काही गावे कायम दुष्काळग्रस्त व अवर्षणग्रस्त म्हणून ओळखली जातात. म्हाळसाकांत उपसा जलसिंचन योजनेसाठी सर्वेक्षण झाले; पण पुढे काय झाले माहीत नाही. या भागामध्ये कायम स्वरूपी पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीला पाणी मिळावे अशी मागणी शेतकरी मागणी करीत आहेत; पण शासन पातळीवर त्याची दखल घेतली जात नाही.
– ज्योती गोरडे, ग्रामपंचायत सदस्या, मांदळेवाडी