पुणे – अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळीसाठी नागरिकांची खरेदीची झुंबड उडाली आहे. विविध साहित्य, कपडे खरेदीसाठी दिवाळीआधीचे दोनच रविवार उरल्याने बाजारपेठेत ही गर्दी पहायला मिळत आहे. यामुळे व्यापारी बांधवांमध्येही समाधानाचे वातावरण दिसून आले.
बाजारपेठेमध्ये महत्त्वाचा असलेला भाग हा लक्ष्मी रस्ता आहे. त्या भागात कपडे खरेदीसाठी नागरिकांनी रविवारी प्रचंड गर्दी केली. याशिवाय मंडई परिसरातही पुणेकरांसह उपनगरांतील ग्राहकांनी अलोट गर्दी केली. सोबतच फराळ बनवण्याचीही गडबड आता घरोघरी सुरू होईल. त्याच्या साहित्य खरेदीसाठीही नागरिकांनी मंडई परिसरात गर्दी केली.
बेलबाग चौक, तुळशीबाग, दगडूशेठ मंदिर भागातील रस्ते नागरिकांच्या गर्दीने व्यापले होते.
सराफा बाजारातही गर्दी
दिवाळीमध्ये साडेतीन मुहुर्तापैकी एक असा पाडव्याचा मुहूर्त असतो. त्यादिवशी सोन्या-चांदीच्या वस्तूंची खरेदी होते. परंतु मनासारखा दागिना मिळावा यासाठी “मेड टू ऑर्डर’ करण्यासाठीही सराफी बाजारात पक्ष पंधरवड्यानंतर गर्दी झाली. दसरा आणि आता दिवाळीच्या तोंडावर ही गर्दीही दिवसेंदिवस वाढत आहे. याशिवाय लग्नाचा मुहूर्त करून याच कालावधीत बस्ता बांधणे, दागिने याचीही खरेदी अनेकांनी उरकून घेण्याची लगबग सुरू केल्याचे दृश्य दिसून येत आहे.
वाहतूक कोंडी
सायंकाळी चार वाजल्यानंतर गर्दी वाढल्याने लक्ष्मी रस्त्यावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालकांचे हाल झाले. सार्वजनिक वाहनतळ फुल झाल्याने नागरिकांनी गल्ली-बोळांत वाहने उभी केली. त्यामुळे तेथेही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.