कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये अयशस्वी पॅरा-जंपमुळे भारतीय नौदलाच्या विशेष दलाच्या जवानाला आपला जीव गमवावा लागला आहे. चंडका गोविंद असे त्यांचे नाव असून ते आंध्र प्रदेशचे रहिवासी होते. त्यांचे पॅराशूट न उघडल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना बुधवारी पहाटे घडली. नौदल प्रमुख आर हरी कुमार यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
संरक्षण प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, गोविंद हे विशाखापट्टणममधील नौदलाच्या मरीन कमांडोजच्या आयएनएसशी संलग्न होते. गोविंद यांचे पॅराशूट उघडले नाही, त्यामुळे ते बुधवारी सकाळी पश्चिम बंगालमधील बांकुरा जिल्ह्यातील बरजोरा येथील कारखान्याजवळ पडले, असे सांगितले जात आहे. पोलिसांनी त्यांना तातडीने बरजोरा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद हे पश्चिम बंगालच्या बर्दवान जिल्ह्यातील पानागढ येथील एअरफोर्स स्टेशन अर्जन सिंग येथे प्रशिक्षित पॅराट्रूपर्सच्या टीमचा एक भाग होते, जे सी130जे सुपर हर्क्युलस विमानातून उतरताना बेपत्ता झाले होते. या घटनेच्या चौकशीसाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन करण्यात आली आहे. प्रथमदर्शनी असे दिसते की, त्यांचे मुख्य पॅराशूट उघडण्यात ते अयशस्वी झाले होते.