पिंपरी, दि. 6 – महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आलेल्या प्रत्येक रुग्णाला सर्वोत्तम उपचार मिळावेत, यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. त्यासाठी रुग्णालयांमध्ये अनुभवी डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सर्वोत्तम उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. रुग्णालयात आलेला प्रत्येक रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांना सर्वोत्तम सेवा देण्याकरिता महापालिका कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी थेरगाव येथील महापालिकेच्या नवीन रुग्णालयास भेट दिली. तसेच, रुग्णालयातील सर्व विभागांची प्रत्यक्ष पाहणी करून रुग्णालयीन कामकाजाकरिता आवश्यक उपकरणे तातडीने उपलब्ध करून देणेबाबत संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, रुग्णालय प्रमुख डॉ. अभयचंद्र दादेवार, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय सोनेकर, डॉ. रविंद्र मंडपे व थेरगाव रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थित होते.
सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी रुग्णालयाच्या प्रत्यक्ष कामकाजाची माहिती सांगितली.