‘मराठवाडा तहानलेलाच…मुख्यमंत्र्यांच्या घोषणा म्हणजे भूलथापाचं’

 ३६५ दिवस स्वच्छ पाणी देण्याचा सरकारचा दावा खोटा

मुंबई: गेली पाच वर्षे मराठवाड्याच्या विकासाला चालना देण्यासाठी सिंचन, रोजगार, रस्ते तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी फडणवीस सरकार प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे. गावागावांमध्ये ३६५ दिवस स्वच्छ पाणी देऊ, असा दावा फडणवीस सरकारने केला आहे. प्रत्यक्षात मराठवाड्याचा होता तोदेखील विकास दिसेनासा झाला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर भाजपवर टीका केली आहे. दुष्काळी भागात शेतकरी मरणकळा सोसत आहेत. घोटभर पाण्यासाठी मैलोन् मैल पायपीट करावी लागतेय. मुक्या जनावरांचा जीव जातोय. कोट्यवधी रुपयांचा चुराडा करूनही मराठवाड्यात अनेक भागात टँकरचा ससेमिरा सुटलेला नाही. मग, मुख्यमंत्री महोदय कुठल्या तोंडाने मराठवाड्याला स्वच्छ पाणी देऊ, असे सांगतात? असा प्रश्न देखील राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे.

इथं सरकार जलयुक्त शिवारच्या नावाखाली विकास झाल्याचा आव आणते. शेतकऱ्यांच्या आक्रोशानंतर वॉटरग्रीड संकल्पना पुढे आणून दुष्काळमुक्तीची वल्गना करते. तरी गेली पाच वर्षे मराठवाडा कोरडाच राहिला. त्यामुळे दुष्काळमुक्तीसाठी मराठवाड्यातील धरणे लूप पद्धतीने जोडून ६४ हजार किमीच्या पाइपलाइनच्या माध्यमातून गावोगावी स्वच्छ पाणी देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणा म्हणजे भूलथापाच ठरल्या असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here