आरोग्य अधिकाऱ्यांना शिवसैनिकांनी कोंडले

कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नावरून शिवसेना नगरसेवक नियाज खान आक्रमक झाले आहेत. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी महापालिकेच्या बी वॉर्ड आरोग्य विभागातील आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये कोंडून आरोग्य विभागाला टाळे ठोकले आहे.

कोल्हापूर शहरामध्ये स्वच्छतेसाठी कोल्हापूरचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी हे अहोरात्र झटत आहेत. परंतु महापालिकेचे स्वच्छता विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात असणाऱ्या साटेलोटे पणामुळे कोल्हापूर शहरात स्वच्छतेच्या ऐवजी अस्वच्छता होताना पाहायला मिळत आहे. या सगळ्याला स्वच्छता विभागातील अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक नियाज खान यांनी केला आहे. शहरातील विविध प्रभागात होणाऱ्या अस्वच्छतेला, स्वच्छता विभागातील अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असून त्यांचा कामचुकारपणा जनतेसमोर यावा यासाठी घोषणा देत शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते आज महापालिकेच्या बी वॉर्डमधील आरोग्य निरीक्षक यांच्या कार्यालयात घुसले. संबंधित आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणा बद्दल प्रश्न विचारले परंतु अधिकारी यांनी समर्पक उत्तरं न दिल्यानं आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी आरोग्य निरीक्षकांच्या टीमला आत कोंडून ठेवत बाहेरून टाळे लावले.

शिवसेनेच्या आक्रमक पवित्रा नंतर महापालिकेचे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि कामचुकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवा असा आश्वासन दिल्यानंतर शिवसैनिकांनी आंदोलन मागे घेतलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.