उस्मानाबाद – 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची उस्मानाबाद येथे जय्यत तयारी सुरू आहे. संमेलनाच्या निमित्ताने उस्मानाबाद जिल्ह्याचा इतिहास मांडणारे बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे. या बोधचिन्हाचे प्रकाशन गुरूवार, दि. 7 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष नीतीन तावडे यांनी दिली.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 10, 11, 12 जानेवारी 2020 रोजी उस्मानाबाद येथे होत आहे. यंदाच्या साहित्य संमेलनाचा बहुमान मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेला मिळाल्याने या परिसरातील साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, भौगोलिक इतिहास साहित्यविश्वासमोर ठळकपणे अधोरेखित करण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्याअनुषंगाने संमेलनाच्या पूर्वतयारीला वेग आला आहे.
संमलेनाचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या बोधचिन्हाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या बोधचिन्हाचे प्रकाशन गुरूवार, 7 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 10.30 वाजता अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उस्मानाबाद येथील संपर्क कार्यालयात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास सोलापूर येथील प्रसिद्ध उद्योजक दत्तात्रय सुरवसे, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील साहित्यिक, साहित्यप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष नीतीन तावडे यांनी केले आहे.