सेवा लवकरच सुरू होण्याची चिन्हे
पुणे – मागील अनेक वर्षांपासून असणाऱ्या प्रवाशांच्या “पुणे-बेळगाव जनशताब्दी एक्स्प्रेस’च्या मागणीला हिरवा कंदिल मिळणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
पुणे ते बेळगाव मार्गावर जनशताब्दी एक्स्प्रेस सुरू करावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. ही एक्स्प्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे येत्या काळात पुणे-सांगली-मिरजमार्गे बेळगावला जलद रेल्वे धावण्याची शक्यता असून, पर्यटन आणि उद्योगासाठी ही गाडी वरदान ठरू शकणार आहे.
विश्वमानव एक्स्प्रेसचे एका औपचारिक कार्यक्रमाद्वारे रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगदी यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झाले. बेळगाव येथे झालेल्या या कार्यक्रमात अंगदी यांनी जनशताब्दी गाडी सुरू करण्याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, पुणे-बेळगावदरम्यान थेट रेल्वे सुरू करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने रेल्वे मंत्रालयाने ही एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आता प्रत्यक्षात ही गाडी कधी सुरू होते, याची प्रतीक्षा प्रवाशांना आहे.
अधिकृत वेळापत्रकाची प्रतीक्षा
ही एक्स्प्रेस पुणे रेल्वे स्थानकावरून सकाळी सुटेल. ती परत पुण्यात मुक्कामी येईल. गाडीची देखभाल-दुरुस्ती पुण्यात केली जाईल. प्रवासाचा कालावधी साडेसहा तासांचा असेल. रायबाग, कुडची, मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा, लोणंद हे थांबे गाडीला दिले जातील, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली आहे.
हुबळीपर्यंत विस्तार व्हावा
पुणे-हुबळी इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात होती. आता बेळगावपर्यंत जनशताब्दी गाडी सुरू करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, ही गाडी बेळगावऐवजी हुबळीपर्यंत नेण्याचा विचार होण्याची गरज आहे, असे मत रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी व्यक्त केले.