बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा : मुख्यमंत्र्यांसह सर्व नेत्यांचा पाठिंबा
बारामती -महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेत महाविकास आघाडीचे सरकार मराठी विषय अनिवार्य करणार आहे. आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत, मग ती कोणत्याही माध्यामाची शाळा असो, आम्ही तिथे मराठी भाषा दहावीपर्यंत अनिवार्य करणार आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीमधल्या इतर नेत्यांचाही त्याला पाठिंबा असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. 10) बारामतीत केली.
उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार बारामतीत दाखल झाल्यानंतर बारामतीकरांच्यावतीने त्यांचा सपत्नीक जंगी नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना अजित पवार यांनी केलेल्या भाषणात राज्यातल्या सर्व शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करणार असल्याची घोषणा केली आहे. याप्रसंगी बारामती टेक्सटाईलच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, राज्यातील तीन शक्तीपिठांसह पंढरपूर, शिर्डी देवसंस्थानच्यावतीनेही पवारांचा सत्कार करण्यात आला.
अजित पवार म्हणाले की, बारामतीतील विविध विकासकामांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल. शहर आणि तालुक्यातील रखडलेली विकासकामे देखील मार्गी लावली जातील. पालखी महामार्ग कामे वेगाने सुरू होतील. पालखी महामार्गासाठी जमीन भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल, त्यासाठी शेतकऱ्यांना देखील सहकार्याची भूमिका घेणे अपेक्षित आहे. रेल्वे मार्गामुळे बारामती देशाला जोडली जाणार आहे, त्याबाबतचे प्रयत्न सुरू आहे. रेल्वे मार्गाचे काम देखील तातडीने पूर्णत्वास नेण्याचा विचार आहे.
बारामतीकरांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. आरोग्यविषयक विविध सोयीसुविधा शहरात तसेच पुणे येथील देखील उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी रुग्ण कल्याण कक्ष उभारण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.